पुण्यातील हडपसर भागात राहणार्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणीसोबत काम करणार्या तरुणाने घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अभय बनसोडे असं या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित तरुणी आणि आरोपी हे एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतात. आरोपी साधारणपणे दहा दिवसांपूर्वी तिथे कामाला लागला होता. पीडित तरुणी आधीपासूनच तिथे कामास होती. कामानिमित्त आरोपीची पीडितेसोबत ओळख झाली. १३ तारखेला दुपारच्या सुमारास आरोपी तरुण घरी सोडतो सांगत पीडित तरुणीला सोबत घेऊन निघाला होता. मात्र आरोपी तरुणीला एका लॉजवर घेऊन गेला आणि बलात्कार केला. यानंतर तेथून पसार झाला”.
“तक्रार देण्यासाठी पीडित तरुणीने थेट हडपसर पोलिस स्टेशन गाठलं. पण पोलीस स्टेशनच्या गेटवर येताच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल केले असता बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करत आरोपीला जेरबंद करण्यात करण्यात आलं. पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत,” अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2020 8:56 pm