आकाश कधी निरभ्र, कधी ढगाळ; रात्रीचे तापमान सरासरीच्या पुढे

पुणे : तापमानातील वाढीमुळे सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच पुढील आठवडाभरात शहरातील तापमानात झपाटय़ाने बदल होण्याची शक्यता आहे. कधी निरभ्र आकाश, तर कधी ढगाळ वातावरणाची स्थिती राहणार असल्याने दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

राज्याच्या बहुतांश भागातून आता थंडी गायब झाली असून, तापमानात वाढ नोंदिविली जात आहे. शहरातही पाच ते सहा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असून, तो कायम राहिला आहे. सध्या पूर्वेकडून वाहात असलेल्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील तापमानात वाढ झालेली दिसून येते. विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. महाबळेश्वर वगळता सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३६ अंशांच्या आसपास आहे. गुरुवारी नगर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पुणे शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी कमाल तापमानाचा पारा ३४.५ अंशांवर, तर रात्रीचे किमान तापमान १६.० अंशांवर होते. कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २.२ अंशांनी, तर किमान तापमान ३.४ अंशांनी अधिक होते. शहरात ११ फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. ३० अंशांच्या खाली असणारे कमाल तापमान आठवडय़ापासून ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान राहते आहे. दुपारी उन्हाचा चटका वाढला असल्याने घरे आणि कार्यालयांत पंखे आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. रात्रीचा गारवाही आता कमी झाला आहे. मात्र, पुढील आठवडाभर शहरातील हवामानात पुन्हा काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमानात किंचित घट होण्याची शक्यता  व्यक्त करण्यात आली आहे.

दिवसाचे तापमान ३४ ते ३५ अंशांवर

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात पुढील आठवडाभर आकाशाची स्थिती सातत्याने बदलती राहणार आहे. २१ फेब्रुवारीला आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. २२ फेब्रुवारीला ते अंशत: ढगाळ होण्याची शक्यता आहे. २३ फेब्रुवारीला आकाश पुन्हा निरभ्र होईल. २४ फेब्रुवारीला अंशत: ढगाळ आणि २५ फेब्रुवारीला आकाश निरभ्र होईल. ही स्थिती लक्षात घेता दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होणार आहेत. दिवसाचे तापमान ३४ ते ३५ अंशांच्या आसपास राहील. रात्रीचे किमान तापमान मात्र, एक ते दोन दिवस १४ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.