राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा (एनएफएआय) ५२ वा वर्धापनदिन १ फेब्रुवारीला (सोमवारी) साजरा करण्यात येणार आहे. संग्रहालयाकडे जतन करण्यात आलेला चित्रपटांविषयीच्या विविध वस्तूंचा ठेवा या दिवशी नागरिकांना पाहता येईल.
स्थापनेपासून आतापर्यंतची संग्रहालयाची वाटचाल दाखवणाऱ्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन विधी महाविद्यालय रस्त्यावरील संग्रहालयाच्या इमारतीत उभारले जाईल, अशी माहिती संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे, तर जतन केलेल्या वस्तू संग्रहालयाच्या कोथरूड येथील नवीन इमारतीत सकाळी ११ ते १ या वेळात बघता येतील.
संग्रहालयाची स्थापना १९६४ मध्ये करण्यात आली होती. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात ठरलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या दादासाहेब फाळके दिग्दर्शित चित्रपटासह जवळपास १ लाख तीस हजार चित्रपटांची रिळे संग्रहालयाकडे जतन केली आहेत. ३० हजार चित्रपटांच्या पटकथा, चित्रपटांविषयीची २८ हजार पुस्तके, दुर्मिळ छायाचित्रे, भित्तीपत्रके आणि गाण्यांच्या पुस्तकांचाही या ठेव्यात समावेश आहे. गेल्या वर्षभरात संग्रहालयाने पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरातील ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाची पटकथा, १९३५ साली आलेल्या बंगाली भाषेतील ‘देवदास’ या चित्रपटाची डीव्हीडी प्रत, १९४७ मध्ये बनवल्या गेलेल्या ‘पल्लीनाटी युद्धम’ या तेलुगु चित्रपटाची नायट्रेट फिल्म या वस्तू जतन केल्या आहेत.
नागरिकांकडे दुर्मिळ चित्रपटांची रिळे किंवा त्याच्याशी संबंधित इतर दुर्मिळ वस्तू असतील तर त्यांनी त्या जतन करण्यासाठी संग्रहालयाकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन मगदूम यांनी केले.