भोसरी पोटनिवडणूक स्थगित न करण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतल्याने पिंपरी पालिकेने निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. नाटय़मय घडामोडीत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांची मुलगी कु. श्रद्धा लांडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने अन्य इच्छुकांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीत धुसफूस, भाजपला उमेदवाराचा शोध, सेनेचाही उमेदवार िरगणात अशा घडामोडींमुळे ‘गोंधळात गोंधळ’ असे चित्र निर्माण झाले आहे.
सात जुलैला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारीअर्ज भरण्याच्या मुदतीत राष्ट्रवादीकडून लांडे, भाजपकडून मीना सोनवलकर, शिवसेनेकडून सारिका कोतवाल व राष्ट्रवादी बंडखोर सुजाता प्रवीण लोंढे असे चार अर्ज दाखल झाले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भोसरीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या असून आमदार विलास लांडे व बाजीराव लांडे यांच्यातील जुने सख्य फळाला आल्याने गेल्या वेळी भाजपच्या उमेदवार असलेल्या श्रद्धा लांडे यंदा राष्ट्रवादीच्या उमेदवार ठरल्या आहेत. लांडेंना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली असून खऱ्या ओबीसींवर अन्याय झाल्याचा सूर आहे.
महापौर मोहिनी लांडे, विलास लांडे, बाजीराव लांडे, पक्षनेते मंगला कदम, नगरसेवक महेश लांडगे, अजित गव्हाणे, सुरेखा गव्हाणे आदींच्या उपस्थितीत श्रद्धा लांडे यांचा अर्ज भरण्यात आला. कोतवालांचा अर्ज जिल्हाप्रमुख मच्िंछद्र खराडे, शहर उपप्रमुख विजय फुगे, नगरसेविका सुलभा उबाळे, महादू गव्हाणे यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. आमच्याकडे सात उमेदवार आहेत, असा दावा करणाऱ्या भाजपला उमेदवाराचा शोध घेण्याची नामुष्की ओढावली. कोणीच नाही म्हणून चिंचवडच्या माजी नगरसेविका उमा खापरे यांचा अर्ज भरण्यापर्यंत विचार सुरू होता. अखेर, नेहरूनगरच्या सोनवलकरांचा अर्ज भरण्यात आला. भाजपतर्फे अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या राणी गजानन लांडगे यांचा अर्ज जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे लांडगे-पठारे परिवारात नाराजी होती.