मला भाजपावाल्यांनी टाकून दिलेलं खात दिलेलं आहे. आपला पक्ष छोटा असल्याने त्यांनी असं केल्याचं पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास महाराष्ट्र राज्यमंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. चिंचवडमध्ये आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. शाळेतील तफावत याबद्दल बोलताना त्यांनी आपल्याकडील खात्याचे उदाहरण दिले आहे. यानंतर मात्र त्यांनी आपल्या खात्याचं बजेट वाढवण्यात आल्याचं आवर्जून सांगितलं.

महादेव जानकर यांनी म्हटलं आहे की, “जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्याकडे भाजपावाल्यांली टाकून दिलेलं खात दिले, हा कसला पक्ष… छोटा आहे म्हणून तसं केल. पण तुम्ही महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तशा दृष्टीने पाहू नका. या शाळांवर लक्ष व्यवस्थित दिलं तर उद्याचा दिवस चांगला येईल”.

आपल्या जीवनात शिक्षण किती महत्वाचे आहे हे जानकर यांनी पटवून दिले. “आज अमेरिका, रशिया देश जगावर राज्य करत आहेत. आपल्या येथे गुणवत्ता आहे, मात्र त्याला व्यवस्थित संधी मिळत नाही हे आपले दुर्दैव आहे,” अशी खंत जानकरांनी व्यक्त केली. ज्याला आज आदर्श शिक्षक पुरस्कार दिला गेला आहे त्यांची किती मुलं महानगर पालिका आणि जिल्हा परिषद शाळेत शिकतात याचे उत्तर नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.