परवानग्यांमध्ये प्रकल्प रखडल्याचा बांधकाम व्यावसायिकांचा दावा

बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि नोटाबंदीनंतर गडगडलेल्या घर खरेदीच्या स्थितीत अद्यापही फारशी सुधारणा झालेली नाही. नव्या आर्थिक वर्षांत रेडीरेकनरची (वार्षिक बाजार मूल्य) दरवाढ होऊन घरे महागण्याची शक्यता असताना शेवटच्या महिन्यात आणि विशेषत: गुढीपाडव्याच्या पाश्र्वभूमीवर नोंदणी विभागात खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ अपेक्षित असताना या काळातही फारसा परिणाम दिसून आला नाही. मुहूर्ताच्या खरेदीला यंदा मुंबई विभागामध्ये विविध प्रकल्प सादर करण्यात आले होते. पुणे विभागात मात्र घर खरेदीतील घरघर कायम असल्याने नव्या प्रकल्पांना लगाम लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, घरांना मागणी असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत असून, अनेक प्रकल्प सध्या पर्यावरण परवानग्यांमध्ये रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे विस्तारलेले जाळे आणि शिक्षण, रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी घरांना मोठय़ा प्रमाणावर मागणी निर्माण होऊन बांधकाम क्षेत्राला अक्षरश: सोन्याचे दिवस आले होते. परंतु, मागील तीन ते चार वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदीची स्थिती आली आहे. घर खरेदी-विक्रीबाबत होणाऱ्या नोंदणीतून ही बाब वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. २०१४ मध्ये घरखरेदीची स्थिती काहीशी चांगली होती. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी २०१५ मध्ये घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये संपूर्ण राज्यातच मोठय़ा प्रमाणावर घट नोंदविली गेली. रेडीरेकनर वाढ होण्यापूर्वीच्या महिन्यात २०१४ मध्ये झालेले घर खरेदी-विक्रीचे व्यवहार २०१५ मध्ये निम्म्यावर आले होते. त्यानंतर २०१६ मध्ये स्थिती काहीशी सुधारत असतानाच नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर घर खरेदी गडगडली होती.

यंदाही एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये आणि विशेषत: गुढीपाडव्याच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर घर खरेदीचे व्यवहार अपेक्षित होते. मात्र, नोंदणी कार्यालयात या काळातही फारसे व्यवहार झाले नाहीत. अद्यापही ही स्थिती कायम आहे. मुख्य म्हणजे मुंबई विभागामध्ये यंदा पाडव्यासाठी नवे बांधकाम प्रकल्प सादर करण्यात आले होते. पुणे विभागात तशी स्थिती दिसली नाही. केवळ बोटावर मोजण्याइतके प्रकल्प पाडव्याला सादर करण्यात आले. अनेकांनी जुन्याच प्रकल्पातील शिल्लक घरांच्या विक्रीवर भर दिला.

अनेक प्रकल्प तांत्रिक बाबींमध्ये

नवे प्रकल्प नसल्याची बाब खरी असली, तरी सध्या अनेक प्रकल्प पर्यावरणाच्या परवानगीसह काही तांत्रिक बाबींमध्ये आहेत. त्यामुळे ते रांगेत आहेत. परवानग्यांना काहीसा उशीर लागतो आहे. त्यामुळे नवे प्रकल्प नसल्याचे दिसते आहे. नवीन प्रकल्प आले, तर ग्राहकांनाही आवडीनुसार पर्याय उपलब्ध होत असतो. त्यामुळे ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहिली पाहिजे, असे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले.