महापालिकेच्या औषध खरेदीत लाखो रुपये जादा दिले जाणार असल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर या खरेदीचा जो विषय मंगळवारी मंजूर करण्यात आला त्याचा फेरविचार करावा, असा ठराव बुधवारी स्थायी समितीला देण्यात आला. स्थायी समितीमधील शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी हा ठराव दिला आहे.
जलपर्णी नाशक तसेच डास आळी प्रतिबंधक कीटक नाशकांची खरेदी करण्याचा तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजूर करण्यात आला. मात्र, हीच कीटक नाशके राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने निम्म्या दराने खरेदी केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, असा ठराव शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार आणि भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांनी समितीला बुधवारी दिला.
‘तीन वर्षे अशाच प्रकारे खरेदी’
हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आल्यानंतर आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मूळ निविदा प्रक्रियेतच त्रुटी असल्याचाही आक्षेप आम्ही घेतला होता. एका कीटक नाशकाच्या पुरवठय़ासाठी एकच निविदा आली आहे. तरीही फेरनिविदा न काढता ज्या पुरवठादाराची निविदा आली आहे ती मंजूर करण्यात आली आहे. निविदा भरणाऱ्या तीन पुरवठादारांना काम वाटून देण्यात आले आहे, असे आमचे आक्षेप होते. मात्र, अशाचप्रकारे गेली तीन वर्षे खरेदी केली जात असल्याचे उत्तर आरोग्यप्रमुखांनी दिले, असे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 2:43 am