राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये लोकमान्य टिळक यांचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी टिळकांच्या वंशज आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांनी राजस्थान सरकारकडे निषेध आणि राग व्यक्त केला आहे. लोकमान्य टिळक यांच्याबाबतीत केलेला वादग्रस्त उल्लेख तातडीने काढून टाकावा आणि पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पुस्तक छापणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.

ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील ६४ पैकी ५० वर्ष राष्ट्रासाठी अर्पण केली, त्याच्याबद्दल अशाप्रकारचा उल्लेख करणं खरंच अत्यंत धक्कादायक आणि चिड आणणारं आहे. यामुळे केवळ एका स्वातंत्र्य सेनानीची प्रतिमा खराब झाली नाही तर हा राष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात टिळक यांनी आपला राग व्यक्त केला.

या संदर्भात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तो संदर्भ काढू नका तर पुस्तकावर बंदी घाला आणि ते पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या, कारण हा केवळ टिळकांचा अपमान नाही तर राष्ट्राचा अपमान आहे, असं टिळक यांनी पत्रात म्हटलंय.

काय आहे प्रकरण –

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे. ‘अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. ‘टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात. ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे.