पुणे : उपाहारगृहे, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार आता रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना खूशखबर दिली आहे. व्यायामशाळाही रविवारपासून (२५ ऑक्टोबर) खुल्या होणार आहेत.

टाळेबंदीतील र्निबध शिथिल करताना पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि िपपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उपाहारगृहे, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना सकाळी आठ ते रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश द्यावा, असे या आदेशामध्ये नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना किमान पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. सुरक्षित अंतराच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असून त्यासाठी महापालिकेची विविध पथके तपासणी करणार आहेत.

शहरातील व्यायामशाळा रविवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार व्यायामशाळा सुरू करताना आरोग्य खात्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी, असे महापालिकेने आदेशामध्ये नमूद केले आहे.

उपाहारगृहे रात्री साडेअकरापर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयामुळे टाळेबंदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर फटका बसलेल्या उपाहारगृह उद्योगाला नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने चालना मिळेल.

– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलियर असोसिएशन