अनेक चुका, गोंधळ यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सातवी आणि चौथीच्या शिष्यवृत्तीचा निकाल अखेर सोमवारी जाहीर केला. मात्र, शिष्यवृत्ती मिळाल्याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २३ मार्चला राज्यभरात ही परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी (९ जून) जाहीर करण्यात आला. शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार १ मे रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, या तरतुदीचा कायमचाच विसर परीक्षा परिषदेला पडला आहे. या वर्षीही परीक्षा झाल्यावर तब्बल अडीच महिन्यांनी निकाल जाहीर करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या या निकालाबाबत उत्सुकतेची असलेली शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी परिषदेने जाहीर केलेली नाही. परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. मात्र, आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार की नाही हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले गुण पाहून त्याबाबत काही आक्षेप असल्यास परिषदेला कळवायचे आहेत. सर्व आक्षेपांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम निकाल आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीच्या यादीत बदल झाल्यामुळे यादीतून आयत्या वेळी वगळण्यात आलेले विद्यार्थी निराश होतात. त्यावर तोडगा म्हणून या वर्षीपासून हा उपाय परिषदेने शोधून काढला आहे.
‘निकाल आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यावर त्यावर काही आक्षेप येतात. विद्यार्थ्यांच्या यादीत आणि गुणांमध्ये त्या आक्षेपांनुसार फरक पडतो. त्यामुळे यादीतील शेवटच्या विद्यार्थ्यांना आधी शिष्यवृत्ती मिळाल्याचे जाहीर करून नंतर यादी बदलल्यावर वगळावे लागते. मुलांना अशाप्रकारे निराश व्हावे लागू नये म्हणून आधी त्यांना त्यांचे गुण दाखवून सर्व आक्षेपांची पडताळणी करून मगच अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. महिनाभरामध्ये अंतिम यादी जाहीर करण्यात येईल,’ असे परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थी आपला परीक्षा क्रमांक वापरून www.mscepune.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील.