News Flash

हिंजवडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

समस्यांची पाहणी करण्यासाठी बापट यांनी अधिकाऱ्यांसमवेत चार तासांचा दौरा केला.

हिंजवडीतील रस्तेकामांची पालकमंत्री गिरीश बापट  यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली

पालकमंत्र्यांचे पाहणी दौऱ्यात आदेश; अधिकाऱ्यांची दमछाक

गेल्या कित्येक वर्षांपासून हिंजवडीतील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही शुक्रवारी नव्याने अनुभवला. येथील समस्यांची पाहणी करण्यासाठी बापट यांनी अधिकाऱ्यांसमवेत चार तासांचा दौरा केला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. बालेवाडी, म्हाळुंगे, हिंजवडी, माण, चांदे आदी भागातील पाहणी केल्यानंतर त्यांनी बैठकही घेतली. शेतकऱ्यांनी रस्त्यांच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच हिंजवडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीच्या समस्येसाठी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत बापट यांनी, हिंजवडीला प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते आले व जवळपास दोन वाजेपर्यंत ते हिंजवडी हिंजवडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश परिसरातच होते. अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून त्यांनी शेवटी बैठकही घेतली, तेव्हा वाहतूक कोंडीसह हिंजवडीच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, पिंपरी पालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील, पिंपरीचे नगरसेवक शत्रुघ्न काटे आदी या वेळी उपस्थित होते. विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकही मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होते.

हिंजवडी येथील रस्त्यांचा विकास, रखडलेले रस्ते, वाहतूक कोंडीची ठिकाणे, त्याची कारणे, प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आदींविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी हिंजवडीला जोडणारे सर्व रस्ते तातडीने पूर्ण झाले पाहिजेत व त्यासाठी आवश्यक ती कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना बापट यांनी केल्या. रुंदीकरणासाठी जागा ताब्यात मिळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता संबंधित शेतक ऱ्यांशी बापट यांनी संवाद साधला. रस्तेरुंदीकरणासाठी पर्यायाने विकासासाठी सहकार्य करा, असे आवाहन करतानाच योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक ती कार्यवाही करा. हिंजवडीचा वाहतुकीचा तसेच कचऱ्याचा प्रश्न ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व एमआयडीसीचे अधिकारी यांना सोबत घेऊन समन्वयाने सोडवण्यात येईल. शेतक ऱ्यांच्या व नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात येईल. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल, असे बापट यांनी या वेळी स्पष्ट केले.

असे नियोजन दररोज केले तर..

हिंजवडीतील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री येणार म्हणून प्रशासकीय पातळीवर बऱ्यापैकी खबरदारी घेण्यात आली होती. या मार्गावरील व्यावसायिकांची अतिक्रमणे तात्पुरती का होईना हटवण्यात आली होती. रिक्षाचालकांना मज्जाव करण्यात आला. हातगाडय़ा बाजूला करण्यात आल्या. नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रण दिव्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियोजन न करता मनुष्यबळाद्वारे करण्यात आले. हिंजवडीकडे जाणाऱ्यांना प्राधान्याने जाऊ देण्यात आले. पर्यायी मार्गानी वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र, तरीही पालकमंत्र्यांना या पाहणी दौऱ्यादरम्यान हिंजवडीच्या वाहतूक कोंडीचा अनुभव आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:54 am

Web Title: road work issue near hinjewadi pune guardian minister girish bapat
Next Stories
1 घराबाहेर पडू न शकणाऱ्यांचा ‘आधार’साठी विचारही नाही!
2 नाटय़गृहांना जीएसटी फटका
3 ‘सौर ऊर्जेचा वापर ही काळाजी गरज’
Just Now!
X