एशिया ब्रॉडकास्टिंग युनियनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत व्हिएतनामच्या लॅक हाँग युनिव्हर्सिटीच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. मात्र, यजमानपद भूषवणाऱ्या भारतीय संघांना मात्र उपांत्यपूर्व फेरीतही स्थान मिळवता आले नसून एकाच पारितोषिकावर समाधान मानावे लागले आहे. मुंबईच्या व्हीजेआयटीच्या संघाला पॅनासोनिक पुरस्कार मिळाला आहे.
एशिया ब्रॉडकास्टिंग युनियनतर्फे आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा घेण्यात येते. या वर्षी या स्पर्धेचे यजमान पद भारताला मिळाले होते. सहा वर्षांनंतर भारतात ही स्पर्धा रंगली. दूरदर्शन व एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातर्फे भारतातील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बालेवाडी येथील क्रीडानगरी येथे ही स्पर्धा झाली. या वर्षी ‘पालकत्वाला सलाम’ अशी संकल्पना या स्पर्धेसाठी देण्यात आली होती. जगातील १६ देशांमधील १८ अभियांत्रिकी महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. भारताकडे यजमानपद असल्यामुळे भारतातील दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारताचे प्रतिनिधित्व अहमदाबाद येथील निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मुंबईतील व्हीजेटीआय महाविद्यालयाने केले.
स्पर्धेच्या साखळी फेरीतून व्हिएतनाम, जपान, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, रशिया या सहा संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत झालेल्या लढतींमधून व्हिएतनाम, जपान, थायलंड आणि इंडोनेशिया या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली. या फेरीत व्हिएतनामने इंडोनेशियावर मात करून आणि जपानने थायलंडवर मात करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. व्हिएतनामच्या लॅक हाँग युनिव्हर्सिटीच्या संघाने जपानच्या नागोया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाचा ८०-३० अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत तिसरा क्रमांक आणि उत्कृष्ट डिझाइन हा पुरस्कार थायलंडच्या संघाने पटकावला आहे. उत्कृष्ट इंजिनिअरिंग पुरस्कार इंडोनेशियाच्या संघाने, तर बेस्ट आयडिया पुरस्कार आणि नागासे पुरस्कार जपानच्या संघाने पटकावला आहे. मुंबईच्या व्हीजेआयटीच्या संघाला पॅनासोनिक पुरस्कार मिळाला आहे.
पुढील वर्षी ही स्पर्धा इंडोनेशिया येथे होणार असून या स्पर्धेसाठी ‘बॅडमिंटन’ अशी संकल्पना आहे. पुढील वर्षीच्या थीमचे अनावरण केंद्रीय माहिती आणि दूरसंचारमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. ‘अभिनवतेच्या बाबतीत भारत अजूनही मागे आहे. म्हणूनच अर्थव्यवस्था सुधारली तरीही विकसित देशांशी आपण बरोबरी करू शकत नाही,’ असे मत जावडेकर यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी एशियन ब्रॉडकास्टिंग युनियनचे सहसचिव डॉ. जावद मोट्टागी, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सीरकर, प्रसार भारतीच्या सहसंचालिका विजयालक्ष्मी छाब्रा, दूरदर्शने अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालक सुनील कराड आदी उपस्थित होते.