प्रवाशांशी थेट व कमी कालावधीत संपर्क साधण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळ आता फेसबुकवरही दाखल झाले आहे. प्रवाशांशी संपर्काबरोबरच विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.
एसटीच्या वतीने गेल्या काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या सोशल नेटवर्किंगमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या फेसबुकचाही वापर एसटीकडून करून घेण्यात येत आहे. www.facebook.com/msrtc.in या पृष्ठाद्वारे प्रवाशांना एसटीशी संपर्क साधता येणार आहे.
फेसबुकच्या माध्यमातून एसटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. प्रवाशांना आवश्यक असलेल्या अद्ययावत बाबींही त्यावर पाहायला मिळतील. फेसबुकच्या या पृष्ठावर प्रवाशांनी नोंदविलेल्या सूचनांचीही दखल घेण्यात येणार आहे.  एसटीच्या या नव्या सुविधेमुळे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले तंत्रज्ञ व्यावसायिक व तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणावर एसटीकडे आकर्षित होईल, असा विश्वास महामंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांनी फेसबुकवर एसटीच्या अधिकृत पृष्ठाद्वारे महामंडळाशी संवाद साधावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी केले आहे.