रशियात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या करिश्मा उदय भोसले या विद्यार्थिनीचा हॉस्टेलमध्ये आग लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पर्वती पायथ्यानजीक असलेल्या लक्ष्मीनगर येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या भोसले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोठी अपेक्षा ठेवून आम्ही करिश्माला रशियात शिक्षणासाठी पाठविले होते. तिच्या अकाली मृत्यूमुळे आमचे स्वप्न भंगले, अशा शब्दांत भोसले कुटुंबीयांनी भावनांना वाट करून दिली. सरकारने करिश्मा आणि पूजा हिचा मृतदेह रशियातून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी व्यक्त केली.
रशियाची राजधानी मॉस्को शहरापासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मोलेन्स्क मेडिकल अॅकेडमीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या करिश्मा भोसले (वय २१, रा. रमणा गणपती मंदिराजवळ, म्हाडा कॉलनी, लक्ष्मीनगर, पर्वती) आणि पूजा कुल्लर (वय २२, रा. मुंबई) या भारतीय विद्यार्थिनींचा हॉस्टेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. रविवारी (१४ फेब्रुवारी) ही दुर्घटना घडली. धुरामुळे या दोघींचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी भोसले कुटुंबीयांना करिश्माच्या मित्र-मैत्रिणींनी या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच भोसले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सुरुवातीला या घटनेची माहिती मिळवण्यासाठी आम्ही रशियात संपर्क साधला. सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली नाही. अखेर त्या शैक्षणिक संस्थेतील एका व्यक्तीशी आमचा संपर्क झाला. परंतु तो दूरध्वनी नंतर बंद करण्यात आला होता. शैक्षणिक संस्थेतील अन्य संपर्क क्रमांक बंद आहेत. करिश्मा आणि पूजा यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा भोसले कु टुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
तिचे शालेय शिक्षण गुलटेकडीतील कटारिया प्रशालेत झाले होते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुक्तांगण कनिष्ठ महविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर तिने वैद्यकीय प्रवेशासाठी सामयिक परीक्षा दिली होती. त्या वेळी ती आजारी होती. त्यामुळे तिला अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही कर्ज काढून तिला पुढील शिक्षणासाठी रशियात पाठवण्याचा निर्णय घेतला. तिच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. मात्र काळाने तिच्यावर घाला घातल्याने आमचे स्वप्न भंगले, अशी भावना भोसले कुटुंबीयांनी व्यक्त केली.