‘लोकसत्ता’च्या पाहणीतील निरीक्षण

– निम्म्या एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नाही
– निम्म्यांच्या काचाही पारदर्शक नाहीत
शहरातील जवळजवळ निम्म्या एटीएम केंद्रांची सुरक्षा सध्या वाऱ्यावरच आहे. तिथे साधे सुरक्षारक्षकही नाहीत, शस्त्रधारी रक्षक तर दूरचीच गोष्ट. त्याचबरोबर या केंद्रांच्या काचासुद्धा पारदर्शक नाहीत. त्यामुळे ही केंद्रं असलेल्या बँकांनी सुरक्षेबाबतच्या सूचनांना केराची टोपली दाखवली असल्याचेच चित्र आहे.. ‘लोकसत्ता’ने शहराच्या विविध भागातील एटीएम केंद्रांची पाहणी केली. त्यात ही बाब आकडेवारीनिशी उघडकीस आली आहे.
पुण्यात एटीएम फोडण्याचे व त्यातून पैसे चोरण्याचे काही प्रयत्न झाले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) पिंपरी कार्यालयाजवळील एटीएम केंद्र फोडण्याचा सोमवारी रात्री प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नव्हता. गेल्या महिन्यात कसबा पेठ पोलीस चौकीजवळ दारू प्यायलेल्या तरुणांनी एटीएम केंद्रांची तोडफोड केली होती. त्याआधी बंगळुरु येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर खुनी हल्ला झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षिततेबाबत विविध सूचना केल्या होत्या. एटीएम केंद्रात येणाऱ्या ग्राहकांच्या संरक्षणाची जबाबदारी बँकांचीच असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, या सूचना केल्या, त्याला दोन महिने उलटले तरी त्यावर पुरेशी अंमलबजावणी झालेली नाही, असे पाहणीत आढळले.

पाहणी काय, कुठे आणि निष्कर्ष काय?
– शहरातील फग्र्युसन रस्ता, कर्वे रस्ता, नळस्टॉप ते दांडेकर पूल, टिळक रोड, कसबा पेठ, शास्त्री रस्ता, कोथरूड, सिंहगड रस्ता, धायरी फाटा, औंध, पर्वती या भागातील सुमारे शंभर एटीएम केंद्रांची पाहणी केली.
– या पाहणीत दोनच गोष्टी तपासण्यात आल्या- १. केंद्रावर सुरक्षारक्षक आहे का? २. एटीएम केंद्राच्या काचेतून आतले दिसते की ती अपारदर्शक आहे किंवा त्यावर काही चिकटवण्यात आले आहे?
– शंभरपैकी सुमारे ४६ एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. याशिवाय काही ठिकाणी सुरक्षारक्षकाची खुर्ची दिसत होती. मात्र, सुरक्षारक्षक गायब होते.
– सुरक्षारक्षक आहेत, तिथे एकाही रक्षकाकडे शस्त्र नव्हते.
– शंभरपैकी ४४ एटीएम केंद्रांच्या काचा पारदर्शक नव्हत्या. काही मुळातच अपारदर्शक होत्या, तर काही काचांवर बँकेची जाहिरात लावलेली होती.

काही भागातील निरीक्षणे :
पर्वती परिसरातील पंधरा बँक एटीएमची पाहणी केली असता त्यापैकी आठ एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. तर चार ठिकाणी सुरक्षारक्षक जागेवर नव्हता. नळ स्टॉप चौकापासून शास्त्री रस्त्याकडे येणाऱ्या मार्गावर असलेल्या चार एटीएमपैकी तीन ठिकाणी सुरक्षारक्षक होते. मात्र, दोन एटीएम काचा पारदर्शक असताना त्याच्यावर त्यांच्याच बँकेच्या जाहिराती लावण्यात आलेल्या आहेत. म्हात्रे पुलाजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्राची काच पारदर्शक असली तरी तिथे सुरक्षारक्षक नाही. कसबा पेठ आणि शास्त्री रस्त्यावरील वीसपैकी आठ ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. धायरी फाटा व डीएसके विश्व परिसरातील बारा एटीएमपैकी दहा ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. औंध येथे स्टेट बँकेच्या एटीएमला काच आहे, पण ती दुधी रंगाची आहे. त्यातून आतले काही दिसत नाही. विमाननगर येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम केंद्र आहे. त्याच्या काचेवर भली मोठी जाहिरात आहे. अशी अनेक उदाहरणे पुण्याच्या सर्वच भागात आहेत.

पोलिसांनी बँकांना परिपत्रक काढून घालून दिलेले नियम :
१) एटीएमचे शटर हॅन्डलने हळुवार उघडणारे असावे. ते उघडल्यानंतर वरच्या भागात लॉक करण्याची व्यवस्था असावी.
२) एटीएमचा दर्शनी भाग काचेने बंद व पारदर्शक असावा. दरवाजाबाहेर व आत भरपूर प्रकाश व्यवस्था असावी.
३) दरवाजासमोरील आणि एटीएममधील भाग दिसतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
४) एटीएममध्ये जाणाऱ्या ग्राहकाला दरवाजा आतमधून लॉक करता यावा किंवा विशिष्ट प्रकारचे कार्ड स्वाईप केल्याशिवाय आत जाता येणार नाही, अशी व्यवस्था असावी.
५) एटीएमच्या आतमध्ये दोन ठिकाणी धोक्याचे संदेश देता येऊ शकेल, असे सायरनचे बटन असावे.
६) एटीएमला चोवीस तास शस्त्रधारी कर्मचारी नेमण्यात यावा.
७) एटीएम मशिन उचलून बाहेर नेता येणार नाही, असे बसविण्यात यावे.
८) सुरक्षारक्षकाने एटीएम सेंटरच्या बाहेर कोणतेही वाहन किंवा संशयित व्यक्तीला रेंगाळू देऊ नये.
९) सुरक्षारक्षकाकडे आणीबाणीच्या वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, हद्दीतील पोलीस ठाणे, संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चौकी यांचे फोन क्रमांक उपलब्ध करून द्यावेत.
१०) एटीएममध्ये एका वेळी एकच व्यक्ती उपस्थित राहील, हे सुरक्षारक्षकाने कटाक्षाने पाहावे. एटीएममध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू लावण्यापूर्वी सुरक्षारक्षकाने ती व्यक्ती अधिकृत व योग्य उपकरण लावत आहे, याची खात्री करावी.