राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सुरक्षारक्षक असूनही चोरांना मोकळे रान

१४ डिसेंबरच्या रात्री तीन झाडे तोडली

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या आवारात आठवडाभरात चंदनचोरीच्या दोन वेगवेगळय़ा घटना घडल्या. चंदन चोरटय़ांनी मध्यरात्री प्राणिसंग्रहालयाच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेली. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात रात्रपाळीत सुरक्षारक्षक तैनात असताना या घटना घडल्या. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात किरकोळ स्वरूपाच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. विस्तीर्ण परिसर असलेले संग्रहालयाचे आवार चोरटय़ांच्या दृष्टीने मोकळे रान ठरले आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात शिरलेल्या चोरटय़ांनी १४ डिसेंबर रोजी रात्री चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा प्राणिसंग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली आहेत.  प्राणिसंग्रहालयाच्या आवारात गुरुवारी मध्यरात्री शिरलेल्या चोरटय़ांनी माकड तसेच नीलगायींच्या खंदकालगत असलेली चंदनाची तीन झाडे कापून नेली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात सुरक्षारक्षकांकडून रात्री गस्त घालण्यात येते. मध्यरात्री सुरक्षारक्षक गाढ झोपेत असताना चोरटय़ांनी चंदनाची झाडे कापून नेली. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरटे शिरले होते.

सपरेद्यानापासून काही अंतरावर असलेल्या माकडाच्या खंदकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत चंदनाची दोन झाडे आहेत. चोरटय़ांनी चंदनाची झाडे करवतीच्या साहाय्याने कापली. चंदन असलेला बुंध्याचा भाग कापून चोरटे पसार झाले. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात किरकोळ स्वरूपाच्या चोरीच्या घटना होत असतात. आवारातील लोखंडी जाळय़ा तसेच झाकणे चोरून नेली जातात. अशा घटनांच्या तक्रारी पोलिसांकडे दिल्या जात नाहीत. आठवडाभरात प्राणिसंग्रहालयाच्या आवारात आठवडय़ाभरात चंदनचोरीच्या दोन घटना घडल्याने पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव म्हणाले, की प्राणिसंग्रहालयाचे आवार १३० एकर आहे. आवारात महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून ४८ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सीमाभिंतीवरून चढून चोरटे प्राणिसंग्रहालयाच्या आवारात शिरल्याची शक्यता आहे. आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरटय़ांना टिपण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून करण्यात आलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

चोरटय़ांना धाक बसविण्यासाठी  बंदूकधारी सुरक्षारक्षकांची मागणी

प्राणिसंग्रहालयाच्या आवारात नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक रात्रीही गस्त घालतात. २००९ मध्ये प्राणिसंग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती. त्या वेळी आवारात सुरक्षा विभागाकडून बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. बंदूकधारी सुरक्षारक्षकांमुळे चोरटय़ांना धाक बसतो. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाकडून महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे बंदूकधारी सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २६ जून २०१६ रोजी प्राणिसंग्रहालयाच्या आवारातून शृंगी घुबड चोरीला गेले होते. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या आवारातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे, असे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.

शासकीय कार्यालयांच्या आवारात चंदनचोरी

चंदनाच्या लाकडांना मोठी किंमत मोजली जाते. गेल्या काही वर्षांत सौंदर्यप्रसाधने तसेच चंदनाचे तेल तयार करण्यासाठी चंदनाला मागणी वाढली आहे. त्यामुळे चंदनाची मोठय़ा प्रमाणावर तस्करी केली जाते. परदेशातून चंदनाला मोठी मागणी असते. पुणे शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात असलेली चंदनाची झाडे कापून नेली होती. कोरेगाव पार्क, डेक्कन भागातील काही बंगल्यांच्या आवारात शिरून चोरटय़ांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. पंधरवडय़ापूर्वी नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसच्या आवारातून चंदनाचे झाड चोरटय़ांनी कापून नेले होते. चंदन चोरटय़ांची टोळी बंगले तसेच शासकीय कार्यालयांच्या आवाराची टेहळणी करते. त्यानंतर मध्यरात्री चोरटे झाडे कापून नेतात.