शहरातील अनेक बंगले, सोसायटय़ांच्या आवारातील चंदनाची झाडे चोरणाऱ्यांच्या टोळीने पोलीस मुख्यालयातील झाडेसुद्धा सोडली नाहीत. या चोरटय़ांनी दिवस-रात्र बंदोबस्त असलेल्या शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड करवतीने कापून नेले. या झाडाचे १० ते १२ फूट उंचीचे खोड चोरटय़ांनी रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
सतीश जमदाडे (वय ३८, रा. सुदैव अपार्टमेंट, संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातील पाण्याच्या टाकीजवळ हे चंदनाचे झाड आहे. करवतीच्या साहाय्याने तीन इंच जाडी असलेले १० ते १२ फूट उंचीचे खोड कापून त्याची चोरी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयामध्ये २४ तास बंदोबस्त असतो. अशा परिस्थितीमध्येही पोलिसांना गुंगारा देत चंदन चोरून चोरटे पसार झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे पुढील तपास करीत आहेत.
यापूर्वी पोलीस मुख्यालय आवारातील वेस्टर्न बंगल्याच्या परिसरात असलेली चंदनाच्या दोन झाडांची ३० सप्टेंबर २०१२ रोजी चोरी झाली होती. मात्र, अनंत चतुर्दशी असल्याने ढोल-ताशांच्या आवाजामध्ये ही चोरी घडल्याने समजले नाही. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्ये गुंतल्याने येथे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र, आता या चंदनचोरीच्या घटनेने पोलीस मुख्यालय आवार देखील सुरक्षित आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.