‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून युवा वर्गाच्या गळ्यातील ताईत झालेला लाडका कवी संदीप खरे आता ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हा मराठीतील पहिलाच कवी ठरला आहे.
जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीपच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीजनाही अपार लोकप्रियता लाभली आहे. सलग बारा वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे.
पायरसी आणि अनेक कारणांनी सध्या अडचणीत आलेल्या सीडी व्यवसायामुळे तसेच नव्या युगाची गरज म्हणून संदीप आता ‘डिजिटल’ स्वरूपात जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठीच ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली असून रविवार (७ फेब्रुवारी) पासून हे अॅप कार्यान्वित होणार आहे. यापूर्वी ‘संदीप खरे ऑफिशियल पेज’ या संदीपच्या सोशल पेजला इंटरनेटवर प्रचंड ‘लाइक्स’ मिळाले आहेत. हा प्रतिसाद पाहूनच या अॅपची कल्पना सुचली असल्याचे संदीप खरे याने सांगितले. मराठी साहित्यामध्ये कवीचे स्वत:चे वैयक्तिक अॅप ही कल्पना प्रथमच साकार होत आहे. सध्या ‘गुगल प्ले’वर उपलब्ध असलेले हे अॅप लवकरच ‘आय टय़ून’ आणि ‘अॅमॅझॉन’वरही उपलब्ध होणार आहे. जेथे पुस्तके, सीडी पोहोचू शकत नाहीत आणि कार्यक्रमही जाऊ शकत नाही अशा ठिकाणीही जगभरात ही कविता आता पोहोचू शकेल, अशी आशा संदीपने व्यक्त केली.
असे आहे ‘संदीप खरे’ज वर्ल्ड
– ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल.
– संदीपने आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेल्या कवितांचा समावेश.
– काही कवितांना प्रवीण जोशी यांचे अनुरूप पाश्र्वसंगीत
– लोकप्रिय, कमी वेळेस सादर झालेल्या तसेच अद्याप अप्रकाशित असलेल्या कविता ऐकता येणार
– काही कविता विनामूल्य तर, काही कविता ‘स्ट्रेट फ्रॅम द पोएट’ या अल्बमच्या विविध खंडांद्वारे सशुल्क उपलब्ध.
– काव्यवाचनाच्या जोडीला छापील स्वरूपातील कविताही अॅपवर विनामूल्य पाहण्याची संधी
– संदीपचे नवे कार्यक्रम आणि नवनवीन उपक्रमांविषयीची माहिती