लोकसभा निवडणुकीनंतर आता विधिमंडळाचे अधिवेशन आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता याचा फटका राज्य चित्रपट पुरस्कारांनाही बसला आहे. या पुरस्कारांची अंतिम यादी निश्चित होत असली, तरी मंत्रिमहोदयांना वेळच नसल्याने पुरस्कारांची घोषणा देखील झालेली नाही.
राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रतिष्ठा आहे. दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्य चित्रपट पुरस्कारांचीही घोषणा करण्यात येते. लोकसभा निवडणुकीमुळे यंदाच्या वर्षी हे पुरस्कार लांबणीवर पडले. या पुरस्कारांसाठी यंदा ७३ चित्रपट स्पर्धेत आहेत. या पुरस्कारांबरोबरच २०१३ च्या चित्रपटांना देण्यात येणारे अनुदानही अद्याप देण्यात आलेले नाही. राज्य सरकारतर्फे चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिग्दर्शकासाठी चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार आणि कलाकारासाठी राज कपूर पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा देखील अद्याप बाकी आहे.
मराठी चित्रपटसृष्टीचे राज्य पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. पुरस्कारांच्या निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सर्व चित्रपट पाहिले आहेत. दुसऱ्या फेरीतील पुरस्कारांच्या नामांकनाची यादी देखील तयार झाली आहे. हे पुरस्कार लवकरच निश्चित होतील. मात्र, मंत्रिमहोदयांना वेळ नसल्याच्या कारणामुळे पुरस्कारांची घोषणा करता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमहोदय विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये व्यग्र आहेत. या व्यापातून मुक्त झाल्यानंतर चित्रपट पुरस्कारांचे वितरण होऊ न शकल्यास विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
चित्रभूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम १५ जुलैला
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ज्येष्ठ कलाकाराला दिला जाणारा चित्रभूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम १५ जुलै रोजी मुंबई येथील रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये सांस्कृतिकमंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी सांगितले. याच कार्यक्रमात राज्य सरकारतर्फे जाहीर झालेल्या गेल्या वर्षीचे पुरस्कारविजेते चित्रपट आणि कलाकारांना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कारविजेत्या चित्रपट आणि कलाकारांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उपस्थितीमध्ये व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही कोंडके यांनी सांगितले.