राजकारण आणि साहित्य हे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही हे खरे असले, तरी राजकारणाचे खरे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटलेच नाही, असा सूर विविध वक्त्यांनी रविवारी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘राजकीय घडामोडी आणि मराठी साहित्य’ या विषयावर माजी आमदार उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अॅड. दयानंद बिराजदार आणि रमेश अंधारे यांचा सहभाग होता.
राजकारणात साहित्य आहे तसे साहित्यामध्येही राजकारण आहे. राजकारण्यांना अस्पृश्य समजू नये आणि साहित्यिकांनी टीका केली तरी राजकारण्यांनी राग धरू नये, असे पवार यांनी सांगितले. राजकारण्यांवर एकांगीपणे लिहिले गेले. त्यामुळे राजकारणाचे खरे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटलेले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. बौद्धिक हिंसाचाराच्या कंपूशाहीमुळे सर्जनशीलतेचे कोंब थांबतील काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
समाजातील विविध घटकांचे प्रतिबिंब जेवढय़ा ठळकपणे राजकारणात दिसते, तेवढय़ा सखोल आणि ठसठशीतपणे साहित्यामध्ये उमटत नाही, असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यामध्ये आणि संमेलनामध्ये उमटले पाहिजे. पण, संमेलन हा राजकारणाचा आखाडा बनू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संयुक्त महाराष्ट्र हा साहित्यिकांनी सुरू केलेला लढा आहे, असे भावे यांनी सांगितले. ज्या बेळगावच्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला, ते बेळगावच आज महाराष्ट्रामध्ये नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
………
मी पांढऱ्या पायाचा आणि अपयशी कपाळाचा आहे. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर मी राहतो. माझे शिक्षण मराठीतून झाले. पण, मी मराठीतून बोलू शकत नाही. कारण तेथे मराठी बोलणाऱ्याला काळे फासले जाते. तर, महाराष्ट्रात सत्य बोलणाऱ्याला गोळ्या घातल्या जातात, अशा शब्दांत अॅड. दयानंद बिराजदार यांनी सीमावासीयांच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली.