News Flash

या पंढरीचे सुख पाहता डोळा

आजच्या संगीत सोहळ्यात सादरीकरणासाठी मंजिरी असनारे-केळकर यांचे आगमन झाले.

रितेश-रजनीश मिश्रा

सत्र

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे दुसरे पुष्प. आजच्या स्वरमहोत्सवाची सुरुवात पं. रितेश व पं. रजनीश मिश्रा यांच्या घरंदाज गायकीने झाली. सर्वप्रथम सादरीकरणासाठी त्यांनी मुलतानी हा ख्याल निवडला. विलंबित एकतालातील ‘गोकुल गाँव का छोरा’ ही पारंपरिक बंदिश ठाय लयीत सादर केली. शंखासाखा गंभीर स्वर, देखणे, ओजस्वी व्यक्तिमत्त्व, जसे सामवेद ते बाळ बोलती या गदिमांच्या गीतरामायणामधील लव-कुशांच्या गायनाच्या वर्णनाची आठवण यावी. ही जुगलबंदी नसून सहगायन चालले होते. ज्या स्वरावर न्यास केला, त्याच स्वरापासून पुढला स्वरविचार दुसरा सहगायक सुरू करी. त्यामुळे स्वरविचारात कुठेही खंड, तुटकपणा नव्हता. एकसंध असे देखणे गायन दोन गायक असूनही ऐकावयास मिळणे हा दैवदुर्लभ योग पुण्याच्या या रसिकांच्या नशिबी होता. गमकेचे बहुतांशी प्रकार, बोल-ताना यांनी विलंबित दाद देऊन गेले. द्रुतात एक तराणा, तसेच द्रुत एकतालात ‘आनन मे नंदलाल’ ही बंदिश त्यांनी सादर केली. यानंतर ‘मधुवंती’मधील ‘उन सन लगन लागी रे’ ही त्रितालातील बंदिश मध्यलयीत सादर केली. शेवटी रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव ‘सूर संगम’ या चित्रपटातील पं. राजन-साजन मिश्रा यांनी अजरामर केलेले ‘किरवाणी’ रागावर आधारित ‘साध रे, सूर को साध रे’ हे गीत मोठी दाद देऊन गेले.

यानंतर देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांचे बासरी वादन झाले. पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या या शिष्यांनी ‘मारवा’ या सायंकालीन षाडव जातीच्या रागातील गतीने सुरुवात केली. तबला साथीला पं. रामदास पळसुले होते. श्रुतीवर कांचन लघाटे होत्या.

धीरगंभीर वेणूरवाने, अवरोही अनिबद्ध आलापींनी सायंकालीन संधिकालात गाईगुरे, पशुपक्षी यांची घराकडे जाण्याची ओढ, एक अनामिक हुरहुर, उदासी हे सर्व मनोभाव सुरेख दर्शविले. आलाप जोड झाल्यानंतर रूपक तालात याच रागातील एक गत सादर केली. नंतर त्रितालात ध सा रे् ग म ध ही गत खूप मोठी दाद देऊन गेली. सपाट ताना, गमकेच्या वेगवान ताना या उत्तम व योग्य दिशेने रियाज केल्याची पावती होती. सुरेल असे हे वेणुवादन होते. मात्र तंत अंग, हे अगदी शेवटी दाखवावयास हवे होते. जीभ शक्यतो न वापरता फुंकीनेच बहुतेक सर्व वादन हवे. जिभेचा बेसुमार वापर हा रागाची फार मोठी सौंदर्यहानी करतो. याचे कारण वेणू ही वीणा होऊ शकत नाही. बासरीला तारा नसतात ते फुंकीचे वाद्य आहे.

शेवटी मिश्र भटियाली धून अत्यंत सुरेल गोडव्याने व नजाकतीने सादर करून आपले सहवेणुवादन टाळ्यांच्या गजरात थांबविले.

आजच्या संगीत सोहळ्यात सादरीकरणासाठी मंजिरी असनारे-केळकर यांचे आगमन झाले. ‘झिंझोटी’ रागातील रूपक तालातील बंदिश अत्यंत बांधेसूदपणे त्यांनी मांडली. आकारयुक्त आलापांनी एक प्रकारे भारदस्तपणा त्यांच्या गायनातून दिसत होता. स्वरलगाव तसेच दमसास उत्तम. १५-२० मिनिटे झाली तरी केवळ आलापींनी राग खुलवला जात होता. विख्यात स्वरसंवादिनी वादक गोविंदराव टेंबे म्हणत, ‘गायन हे आलापांनीच खुलवले पाहिजे. स्वरविचाराचा खजिना ज्याचा संपला त्याला ताना घेऊन गाणे मुष्किलीने संपवावे लागते.’ या परिपक्व गायिकेकडे आलापींचा मोठा खजिना आहे. अतिशय श्रवणीय असे हे गायन होते. यानंतर गंधर्व ठेक्यात ‘हे शिव गंगाधर’ ही चीज तर ‘हर हर शंकर’ ही त्रितालातील बंदिश सादर केली.

यानंतर ‘परज’ हा अतिजुना राग झपतालात गायला. ‘बसंत’चेच स्वर पण चलन वेगळे असा हा राग होता. बोल-ताना, लयकारी तयारीची होती. शेवटी ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा’ हा संत एकनाथांचा अभंग आत्यंतिक भक्तिभावाने सादर केला. यासाठी तर लोक आसुसले होते. या अभंगाने श्रोते तृप्त झाले.

आजच्या या स्वरसोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे पं. जसराज यांचे गायन. सुरुवातीस राग ‘जोग’ विलंबित एकतालात सादर केला. ‘पिया घर ना’ हे चीजेचे बोल होते. खर्ज सप्तकामधील मध्यमाच्याही खालील स्वरावर जाण्याची, त्यांना स्पर्श करण्याची क्षमता असावी लागते. त्यामध्ये पंडितजींचा फार वरचा क्रमांक लागतो. कुठेही घाई नाही, गडबड नाही, दोन दोन, तीन स्वर घेऊन केलेले लयबद्ध आलापींचे सौंदर्य अवर्णनीय होते.

हळूहळू नवनवीन स्वरांना संमीलित करत बढतीने आलाप लांबलचक होऊ लागले. तीनही सप्तकात सरगम, बोल-ताना यांची संचारी यामुळे श्रोत्यांची कर्णतृप्ती होत होती.

याच जोग रागातील ‘हनुमान लला मेरे प्यारे लला’ ही त्रितालातील बंदिश सुरेख सादर केली. मुकुंद पेटकर यांचे स्वरसंवादिनीचे स्वर अंत:करणाला भिडत होते. केदार पंडित यांची तबलासाथही उत्तम होती. घसीट, सूंथ, स्वरांची खेच मोठय़ा टाळ्यांचा वर्षांव घेऊन गेली.

शेवटी एक अनवट राग गाऊन, रसिकांच्या आग्रहास्तव ‘ॐ नमो भगवते..’ ही संस्कृत काव्य भक्तिरचना सादर करून दर्जाचा मापदंड असलेले आपले गायन पंडितजींनी थांबविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 3:51 am

Web Title: sawai gandharva bhimsen mahotsav 3
Next Stories
1 कलाकारांची जोडी आणि आविष्काराची गोडी
2 मनसे शहराध्यक्षाकडून अभियंत्यास मारहाण; कार्यालयाची तोडफोड
3 पॅसेंजरला उशीर होत असल्याने संतप्त प्रवाशांनी लोहमार्ग रोखला
Just Now!
X