दहावी आणि बारावीच्या परीक्षेत महापालिका शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांना पंचाऐंशी टक्क्य़ांच्या वर गुण मिळतील, अशा विद्यार्थ्यांना एकावन्न हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी एकमताने घेतला.
दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्य़ांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पंधरा व पंचवीस हजारांची शिष्यवृत्ती महापालिकेतर्फे दिली जाते. या शिष्यवृत्तीप्रमाणे महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती द्यावी, असा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पंचाऐंशी टक्क्य़ांच्या वर गुण मिळतील, अशा विद्यार्थ्यांना एकावन्न हजार रुपयांची शिष्यवृत्ती यापुढे दिली जाईल. मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना या निकषानुसार गुण मिळाले आहेत, त्यांना शिष्यवृत्ती देऊन या योजनेची सुरुवात केली जाईल. यंदा चव्वेचाळीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यासाठी साडेबावीस लाख रुपयांची तरतूद समितीने मंगळवारी केली.
दहावी, बारावीत ऐंशी टक्क्य़ांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सात कोटी रुपये लागणार असून कमी पडणारी रक्कम वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्याचाही निर्णय समितीने घेतल्याचे तांबे यांनी सांगितले. या योजनेचा लाभ यंदा आठ हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.