प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलीचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी रेल्वेस्थानक परिसरात मुलीचा मृतदेह पोलिसांना ३० डिसेंबर २०१५ रोजी सापडला होता. दरम्यान, तिच्या प्रियकराला चतुश्रंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुलीचा खून केल्याची कबुली दिली.
लक्ष्मी ऊर्फ भारती काळे (वय १८ रा. औंध) असे खून झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे, तर तिचा प्रियकर संतोष बाबर (वय २६, रा. बोपोडी ) याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला खुनाच्या गुन्ह्य़ात अटक करण्याची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली आहे. आरोपी संतोष हा मजुरी करतो. तो व्यसनी असून दोन वर्षांपूर्वी औंध येथील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या लक्ष्मी हिच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वी लक्ष्मीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले. दरम्यान, लक्ष्मी हिचे आणखी एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची कुणकुण आरोपी संतोष याला लागली.
तो ३० डिसेंबर २०१५ रोजी तिच्या घराजवळ गेला आणि तिला दुचाकीवर घेऊन खडकीच्या दिशेने गेला. रेल्वेस्थानकानजीक असलेल्या झुडपात तिला आरोपीने नेले. तेवढय़ात तिच्या मोबाईलवर मित्राने संपर्क साधला. संतोष याने लक्ष्मी हिच्या डोक्यात दगड घातला आणि पसार झाला. लक्ष्मीच्या आईने ती  बेपत्ता झाल्याची तक्रार चतुश्रंगी पोलिसांकडे नोंदविली आणि आरोपी संतोष याने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतु, चौकशीत तो माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच संतोष याने शुक्रवारी (१५ जानेवारी ) कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय शिंगाडे, सहायक निरीक्षक शैलजा बोबडे यांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावला.