|| प्राची आमले

शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी आणि संसार यात प्रत्येक जण स्वत:ला आयुष्यभर अडकवून ठेवत असतो. लौकिकदृष्टय़ा स्वत:ला यशस्वीतेच्या व्याख्येत बसवण्यात अनेक जण इतके गुंतून जातात, की त्यांचे स्वत:कडेही दुर्लक्ष होते. परंतु, ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर किंवा उतार वयात अनेक मानसिक प्रश्न भेडसावतात. ताण-तणाव, नात्यांमधील वाढते अंतर, एकटेपणा यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या सोडवण्याबरोबरच त्यांच्या विचारांना योग्य वळण देण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात प्रथमच मानसिक व्यायाम शाळा सुरू करण्यात आली आहे.

‘सेंटर ऑफ अ‍ॅक्शन रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन’ या संस्थेतर्फे ‘रेनबो डे केअर’ हा उपक्रम चालवला जातो. त्याचाच पुढचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा, त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ही मानसिक व्यायाम शाळा सुरू झाली आहे. अशा स्वरूपाच्या मानसिक व्यायामशाळेची कल्पना १९९९ साली अमेरिकेमध्ये अस्तित्वात आली. ज्याप्रमाणे शरीराच्या स्वास्थ्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला सतेज आणि सुदृढ करण्यासाठी मानसिक व्यायामांची गरज असते, हे ध्यानात घेऊन हा उपक्रम चालवला जात आहे.

संस्थेच्या संस्थापिका अनुराधा करकरे म्हणाल्या, ज्येष्ठांबरोबर काम करताना लक्षात आले, की उतार वयात त्यांना अनेक मानसिक प्रश्न भेडसावतात. मनात डोकवणारे नकारात्मक विचार, ताण-तणाव, नात्यांमधील वाढते अंतर, एकटेपणा यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठांमध्ये नैराश्य, भीती, चिंता या आजारांचे प्रमाण अधिक असून ते कायम दुर्लक्षित राहतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अशा अनेक प्रश्नांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे आणि यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या व्यायाम शाळेत उलगडतात.

मानसिक व्यायाम शाळेत विविध कलांचा वापर केला जातो. त्यात प्रामुख्याने संगीत, नाटय़, नृत्य, हस्तकला, स्मरण, खेळ यांचा समावेश आहे. परंतु, या कलांच्या माध्यमातून घेतले जाणारे हे कार्यक्रम करमणुकीचे नसून सेकंड इनिंग अधिक प्रभावी, सुदृढ, सकस आणि निकोप होण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो. केंद्र करमणूकप्रधान नसून ते उन्नतिप्रधान करण्यात येणार आहे, असे करकरे यांनी सांगितले. गट समुपदेशन व वैयक्तिक समुपदेशन देखील व्यायाम शाळेत देण्यात येते. ही व्यायाम शाळा  ५५ वर्षांपुढील महिला-पुरुषांसाठी खुली असून स्वस्थ आणि उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी मानसिक व्यायाम शाळा हे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या व्यायाम शाळेचा हा उपक्रम एरंडवणे येथील छत्रे सभागृह येथे दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळात आयोजित करण्यात येतो. व्यायाम शाळेची अधिक माहिती ९३७३३१४८४९ या क्रमांकावर मिळू शकेल.