‘लक्ष्य २०१७’ साठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच शहरभरातील स्वयंघोषित निवडणूक इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत नगरसेवकपदाची पाटी दारावर लावण्याचा निर्धार करून स्वत:पुरते रणिशग फुंकले आहे. वेगवेगळी प्रलोभने दाखवून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत अशा मंडळींनी वर्षभर आधीच सामाजिक उपक्रमांचा सपाटा लावला आहे. समाजहिताची बोली बोलताना स्वत:च्या सात पिढय़ांच्या उद्धाराचेही गणित डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी कामाला सुरुवात केली आहे.
‘श्रीमंत’ महापालिकेचा ‘विश्वस्त’ होण्याचे स्वप्न अनेकांना पडते आहे. त्यामुळेच निवडणुकांना वर्षभराचा कालावधी असताना अतिउत्साही इच्छुकांनी आताच प्रचाराचा ‘नारळ’ फोडला आहे. मतदारांमध्ये चांगली प्रतिमा ठसवण्यासाठी, त्यांना आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याची चढाओढ शहरात सुरू आहे. मतदारांना आधार कार्ड, पॅन कार्ड काढून देण्यावर सर्वाचा जोर आहे. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन अनेकांनी ‘भाऊजीं’चा वसा चालवला आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या अशा कार्यक्रमांमध्ये पैठण्यांसह आकर्षक बक्षिसांचे वाटप सुरू असून त्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी तीर्थयात्रांचे, तर तरुणाईसाठी सहलींचे आयोजन आहे, तसेच कीर्तन महोत्सवांचा धडाका सुरू आहे. मंडळांच्या मागण्या सुरू झाल्या असून राजकीय प्रायोजकत्वातून जागोजागी क्रिकेटच्या किंवा अन्य स्पर्धाचे आयोजन होऊ लागले आहे. शरीरसौष्ठव स्पर्धा, आरोग्य शिबिरे, महापालिकेच्या विविध योजनांद्वारे साहित्यांचे वाटप, हळदी कुंकू, रोजगार मेळावे, स्वस्तातील एलईडी दिवे अशा विविधांगी कार्यक्रमांचे नियोजन होत आहे. मतदारांचे वाढदिवस साजरे होत आहेत. एखाद्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त पुढे करून जेवणावळी झडू लागल्या आहेत.
काय काय सुरू आहे?
मतदारांना आधार कार्ड, पॅन कार्ड
स्वस्तातील एलईडी दिव्यांचे वाटप
प्रभागात होम मिनिस्टर, पैठण्यांचे वाटप
महापालिका योजनांमधील साहित्याचे वाटप
जागोजागी क्रिकेटचे सामने
चमकोगिरीसाठी ‘काहीपण’
शेतक ऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणारी ‘आठवडे बाजार’ ही संकल्पना इच्छुक मंडळींनी भलतीच उचलून धरली आहे. आठवडे बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे कटआऊट लावून स्वत:चे ‘प्रमोशन’ करण्याची संधी इच्छुकांनी सोडलेली नाही. इच्छुकांच्या अनधिकृत फलकांची ‘भाऊगर्दी’ हे शहराच्या गल्लीबोळातील ठळक चित्र आहे. अनधिकृत फलक लावल्यास कारवाई होते, हे विधान विनोदी वाटते. कारण, महापालिकेच्या कारवाईला कोणीही भीक घालत नाही. गोरगरिबांवर कारवाईचा बडगा उगारणारे अधिकारी अशा मुजोर फलकवीरांपुढे नांगी टाकतात किंवा त्यांचे लाभार्थी तरी होतात, असे चित्र आहे.