रवी परांजपे (ज्येष्ठ चित्रकार)

चित्रकला क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्राशी संबंधित साहित्याचे वाचन साधारणत: १९९० नंतर झाले. अमेरिका, चीनसह भारतातील पारंपरिक चित्रकलेचा अभ्यास करताना नानाविध अभ्यासकांचे भाषणातील मुद्दे माझ्या मनात घर करून राहिले. त्यामुळे मी त्या विषयाच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत वाचनाला सुरुवात केली. वृत्तपत्र हे माझ्या वाचनाचे मूळ असले, तरी संतसाहित्यापासून ते लष्करी क्षेत्रातील लेखनापर्यंत नानाविध विषयांची पुस्तके माझ्या वाचनात आली. किंबहुना, त्यामुळेच माझी लेखनाची परिभाषा समृद्ध झाल्याने मी कोऱ्या कागदावर चित्रांप्रमाणेच सहजतेने शब्दांची ठळक मांडणी करू शकलो.

माझं मूळ गाव बेळगाव. त्यामुळे आमच्या घरामध्ये बहुतांश प्रमाणात हिंदी साहित्य होते. माझ्या वडिलांना (कृष्णाजी) साहित्य, काव्य, चित्रकला, संगीत अशा विषयांची आवड असल्याने विविधांगी क्षेत्रांमधील बारकावे जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. माझे गुरु के. बी. कुलकर्णी, बॅ. नाथ प अशा दिग्गजांचा गोतावळा लहानपणापासून मला पाहायला मिळाला; हे सारे माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते म्हणूनच. बेळगावमध्ये वडिलांच्या पुढाकारानेच हिंदी भाषेच्या प्रचारार्थ हिंदी प्रचार सभेची स्थापना केली. हिंदीमध्ये महादेवी वर्मा, हरिवंशराय बच्चन यांचे साहित्य मी वाचून काढले. या शिवाय लहानपणी वाचलेल्या शेक्सपियरच्या पुस्तकांतील अप्रतिम चित्रांचे दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर अगदी जिवंत असल्यासारखेच उभे राहते. मी चित्रकार होण्यामध्ये माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. लहानपणापासून मला इतर विषयांच्या अभ्यासामध्ये फार रुची नव्हती, त्यामुळे चित्रकलेतील कल पाहता मी १९५८ मध्ये मुंबईत आलो आणि मला प्रवेशही मिळाला.

चित्रकलेचा अभ्यास शिकण्याकरिता प्रवेश घेतलेल्यांमध्ये माझी शैली उठून दिसणारी होती. त्यामुळे त्या काळच्या प्रख्यात चित्रकारांनी मला सातत्याने प्रोत्साहित केले. वृत्तपत्रातील कला विभाग आणि जाहिरात विभागात मला काम मिळाले. तेथे दोन-तीन वष्रे मी नोकरीही केली. दरम्यानच्या काळात अवांतर वाचनाकडे फारसे लक्ष देणे जमले नाही. जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून अमेरिका, युरोप यांसारख्या देशांमध्ये जाण्याची संधीही मिळाली. तेथे काही चित्रकारांना भेटलो, तेव्हा ‘तुमचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे का?’ असा प्रश्न अनेकांनी मला विचारला. त्या वेळी भारतात शिक्षण घेऊनही आपण जगभरातील चित्रकारांमध्ये वेगळा ठसा उमटवू शकतो, याची प्रचिती मला आली.

चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये दीनानाथ दलाल यांच्याकडेच त्या वेळी विविधता होती. त्याचप्रमाणे मीही वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करीत, आíकटेक्चर रेंडिरग या वेगळ्या प्रकारामध्ये कामाला सुरुवात केली आणि संपूर्ण मुंबईमध्ये यासाठी केवळ मी आणि प्रमोद पेंडसे अशी दोन नावे घेतली गेली, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे चित्रकलेमध्ये माझा सुरू झालेला आलेख उंचावू लागला होता. चित्रकलेविषयी लेखन करावे, असे मला नेहमी वाटायचे. लेखनाकरिता वाचन अत्यावश्यक असून तेवढे वाचन तुझे झालेले नाही, याची जाणीव वडिलांनी मला करून दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या परिपूर्ण वाचनाला आणि लेखनाला पुण्यात आल्यानंतर म्हणजे १९९० नंतर सुरुवात झाली. कादंबरीकार मारिओ पुझो यांचे ‘गॉडफादर’, गिरीश कुबेर यांचे अग्रलेख व त्यासंबंधी पुस्तके, चित्रकलेविषयी सुझी गाव्हलिक यांचे ‘हॅज मॉडनिझम फेल्ड?’, फिट्स जेराल्ड यांचे ‘आर्टस्टि अँड द रियल वर्ल्ड’, मेरी मॅकडोवेल यांचे डिझायिनगवरील ‘द आर्टस्टि डिझाइन’, द. ग. गोडसे यांचे ‘नांगी टाकलेले फुलपाखरू’, अरुण सारथी यांचे ‘पं. जवाहरलाल नेहरू’, ‘खिलाफत टू काश्मीर’, शशिकांत पित्रे यांचे ‘डोमेन ते कारगिल’ अशा अनेक पुस्तकांच्या माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे.

जे. जे. स्कूलमधील के. के. मेनन यांच्या चित्रकलेचा माझ्यावर प्रभाव पडला. त्यामुळे माझ्यामध्ये चित्रशैलीची बीजे रोवली गेली. पुण्यामध्ये १९९० नंतर मी स्वतंत्र स्टुडिओ स्थापन करून कामाला सुरुवात केली. तोपर्यंत माझा लेखनप्रवास सुरू झाला नाही. ‘रसिक का दुरावला’ अशा मथळ्याचा पहिला लेख मी वृत्तपत्रामध्ये लिहिला. या दरम्यान चित्रप्रदर्शन आयोजित करणे सुरू होते. वृत्तपत्रांमधील लेखनप्रवास हळूहळू वाढत होता. कलाटणी देणारा प्रसंग, गुरुजन, अविस्मरणीय अशा सदरांसाठी मी लेखन करीत होतो. त्यामुळे लेखनासोबतच विविध विषयांवरील वाचन होत होते. दीनानाथ दलाल हे बहुतांश पुस्तकांचे मुखपृष्ठ करीत असत. मी मुखपृष्ठांचे काम फारसे केले नाही. मात्र, काही रहस्यकथांच्या पुस्तकांकरिता मुखपृष्ठाचे काम केले. त्यामुळे ती पुस्तके काही प्रमाणात वाचनात आली. ‘शिखरे रंग-रेषांची’ हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. शहरासह ग्रामीण भागामध्येही ही लेखमाला वाचकांना आवडत होती. पाश्चिमात्य २६ चित्रकारांवरील माहितीपर पुस्तके मिळवून त्यांच्याविषयी लेखन केले. १९८२ मध्ये अमेरिकेमध्ये मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट या न्यूयॉर्कमधील संग्रहालयात गुस्टेव्ह क्लिम्ट या चित्रकाराविषयी पुस्तक मिळाले. त्या पुस्तकातील वाचनाने माझा वैचारिक पिंड खुलायला लागला.

माधव सातवळेकर, ना. सी. बेंद्रे, दीनानाथ दलाल यांच्या कार्याप्रमाणे आपणही वेगळे लेखन करावे, यासाठी २००६ मध्ये मी ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन लिहिले. तर, ‘नीलधवल ध्वजाखाली’ पुस्तकाचे लेखन करताना ‘आम्ही कोण?’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘एकात्म मानव दर्शन’ अशी पुस्तके वाचली. ‘भारतीय गणतंत्राची माझी गोष्ट’ या मथळ्याखाली दर दोन दिवसांनी फेसबुकवरून मी अडीचशे शब्दांची लेखमाला लिहिली. त्यामुळे भारतीय कला, संस्कृती, इतिहास आणि राजकारणाविषयीचे विचार मला सहजपणे जगासमोर मांडता आले. पुण्यात वाचन आणि लेखनाच्या माध्यमातून अनेक प्रकाशन संस्थांशी संबंध आला. देशांतर्गत आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या उभारणीचा अभ्यास करताना अनेक पलू समोर आले. त्यामध्ये चित्रकलेचा संबंध मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे ‘तांडव हरवताना’ हे पुस्तक या विषयासंदर्भाने लिहीत गेलो. आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी इंटरनेटच्या माध्यमातून वाचन झाले. स्वातंत्र्यदेवीची विनवणी करणारी कुसुमाग्रजांची कविता वाचताना त्या शब्दांनी माझ्या मनात घर केली. भाषेतून प्रत्येक माणसापर्यंत आशय पोहोचविण्याचे काम साहित्याने केले आहे, असे मला वाटते.

माझ्या वाचनप्रवासात अनुभवलेल्या पुस्तकांतील विचारांमध्ये फारशी कल्पकता दिसून येत नाही. याला साहित्य क्षेत्र जबाबदार आहे, असे वाटते. मराठी भाषा आणि साहित्य हीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे इतिहासापलिकडचे विचार लेखनातून कागदावर उतरविण्याची आवश्यकता आहे. पुस्तक वाचन किंवा व्याख्यानांच्या माध्यमातून दिग्गजांचे विचार ऐकताना मनाला भिडणारी अनेक वाक्ये कानावर पडत होती. त्यामुळे ती वाक्ये आपल्या संग्रही राहावी, असे मला नेहमी वाटे. त्याकरिता मी वहीमध्ये या वाक्यांची नोंद केली असून ती वाक्ये वाचताना मला बळ मिळते. माझ्या बुकशेल्फमध्ये आजमितीस मराठी, हिंदीसह इंग्लिश पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. चित्रकला क्षेत्रातील साहित्यासह इतर प्रकारचे साहित्य या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडते. त्यामुळे वाचन आणि लेखन ही साहित्याची दोन अंगे अनुभविण्यासोबतच आपणही त्यामध्ये आपले विचार मांडायला हवेत.