भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेत असलेली मुलाखत पुढे ढकलली आहे. हा मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारी (६ जानेवारी) बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार होता.

जागतिक मराठी अकादमी आणि बी. व्ही. जी. ग्रुपतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या तीन दिवसांच्या जागतिक संमेलनाची बुधवारी राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीने सांगता होणार होती. मात्र, संसदेच्या अधिवेशनामध्ये पवार व्यग्र असल्याने ही मुलाखत तीन दिवस पुढे ढकलावी लागली होती. त्यानुसार ६ जानेवारी रोजी ही मुलाखत होणार होती. मात्र, भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिर आणि अस्वस्थ वातावरणाचा विचार करून शनिवारी होणारी मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सांगितले. ही मुलाखत तूर्त पुढे ढकलण्यात आली असली, तरी ही मुलाखत आता नेमकी केव्हा होणार हे लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.