News Flash

तर्कशुद्धतेने आणि तटस्थपणे केलेल्या अभ्यासाचा सन्मान – प्रा. शेषराव मोरे

सावरकरांचे विचार कालबाह्य़ झालेले नाहीत. बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, हिंदूुत्व आणि धर्मनिरपेक्ष असे सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत.

| July 11, 2015 03:10 am

राष्ट्रीय दृष्टिकोनातून तर्कशुद्धतेने स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे केलेल्या अभ्यासाचा सन्मान झाला असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत आणि चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. य. दि. फडके यांच्यानंतर मला हा बहुमान लाभल्याचा आनंद झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा मी अभ्यास केला. या अभ्यासातून मी तर्कशुद्ध विचारसरणी घेतली. सावरकरांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांत अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन होत असताना साहित्य महामंडळाने मला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान दिला आहे, असे सांगून प्रा. मोरे म्हणाले, सावरकरांचे विचार कालबाह्य़ झालेले नाहीत. बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, हिंदूुत्व आणि धर्मनिरपेक्ष असे सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. या साऱ्यांच्या अभ्यास केल्यानंतर त्यांचे विचार आजही उपयुक्त आहेत हेच मी ठामपणाने सांगू शकतो. सावरकरांच्या विचारांतून युवकांना प्रेरणा मिळेल. मी एकही कथा-कादंबरी लिहिलेली नाही. त्यामुळे मी साहित्यिक आहे की नाही हे मला माहीत नाही असे मी महामंडळाला सांगितले. इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा हे विषय साहित्याचे नाहीत का. हे विषय लेखनामध्ये आल्याखेरीज साहित्य समृद्ध होणार नाही.
राज्यामध्ये दुष्काळ असताना विश्व साहित्य संमेलन घेऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी मांडली होती. त्या विषयी विचारले असता प्रा. मोरे म्हणाले, जीवनामध्ये दु:ख येतच असते. पण, म्हणून आनंदाचे संमेलन घ्यायचे नाही का? अंदमान ही मराठी भाषेची साहित्य पंढरी आहे. त्यामुळे दुष्काळाचे दु:ख विसरून सर्वानी संमेलनामध्ये सहभागी व्हावे.
छत्रपती शिवाजीमहाराज या विषयावर लेखन करण्याचे मनात घोळत आहे. त्या अभ्यासासाठीच दोन महिने पुण्याला वास्तव्यास आलो आहे. शिवाजीमहाराज कशासाठी हवेत. त्या काळामध्ये ते योग्य होते. पण, सध्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये शिवाजीमहाराजांची आठवण का करायची हे मुद्दे या लेखनाद्वारे मांडणार आहे. यामध्ये संशोधन नाही पण, दृष्टी देणारे विचार मांडण्याचा प्रयत्न असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
प्रा. शेषराव मोरे यांची साहित्यसंपदा
– सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास
– सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास
– काश्मीर : एक शापित नंदनवन
– डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास
– विचारकलह
– अप्रिय पण..
– शासनपुरस्कृत मनुवादी : पांडुरंगशास्त्री आठवले
– मुस्लीम मनाचा शोध
– इस्लाम : मेकर ऑफ द मुस्लीम माइंड
– प्रेषितानंतरचे चार आदर्श खलिफा
– १८५७ चा जिहाद
– अप्रिय पण.. (भाग दुसरा)
– काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2015 3:10 am

Web Title: sheshrao more savarkar vishwa sahitya sammelan
Next Stories
1 पालिकेतर्फे बाराशे रिक्षांना यंदा सीएनजी किटसाठी अनुदान
2 ‘ब्लड ऑन कॉल’ अपयशी ठरण्यासाठी खासगी रुग्णालये जबाबदार असल्याचे चित्र
3 प्रशासनाच्या अहवालामुळे पालख्यांचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले
Just Now!
X