‘‘मराठी साहित्यात ‘पोटदुखी’चा आजारच आहे! मराठी पुस्तकांच्या एक हजार प्रती खपण्यासाठी दहा-दहा वर्षे लागतात, असे सांगणारे लेख वृत्तपत्रांमधून लिहिले जातात. पण शिवाजी सावंत यांच्या पुस्तकांच्या विक्रमी खपावर, त्यांच्या लोकप्रियतेवर लिहिले जात नाही. सावंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार द्यावा अशी मागणी तब्बल तीनदा करण्यात आली होती. पण मराठी समीक्षकांनी मात्र त्याला विरोधच केला होता. मराठी साहित्यावर ‘क्ष’ किरण जरूर टाका, पण तुमचे मनच रोगट नाही ना ते आधी तपासून घ्या,’’ असे परखड मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा बुक गॅलरी आणि ‘मृत्युंजय’कार मित्र मंडळ यांच्यातर्फे ‘स्मरण मृत्युंजयकारांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘शिवाजी सावंत : व्यक्ती आणि साहित्य’ या परिसंवादात विश्वास पाटील आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले मनोगत मांडले. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व जोशी यानी संपादित केलेल्या ‘आठवणींतले शिवाजी सावंत’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मृत्युंजय’कार मित्र मंडळाचे जयराम देसाई, अनुबंध प्रकाशनाचे अनिल कुलकर्णी, ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘साहित्यिक कोणत्या जातिधर्माचा आहे, तो आपल्या गावचा, आपल्या विद्यापीठातला आहे का, अशा प्रकारची अनुदार भूमिका सोडायला हवी. शिवाजी सावंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याच्या मागणीला जसा विरोध झाला होता, तसाच विरोध वि. वा. शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याआधीही मराठी समीक्षकांनीच केला होता. त्या वेळी शिशिरकुमार दास या बंगाली समीक्षकाने शिरवाडकर यांचे महत्त्व पुरस्कार समितीला पटवून दिले होते. मराठी साहित्यावर ‘क्ष’ किरण टाकला जावा पण आपले मनच रोगट नाही ना ते आधी तपासून पाहावे.’’
मोरे म्हणाले, ‘‘अपुरा लेख कोणत्या तरी एकाच काळात रममाण होतो. सावंत यांनी पुराणकालीन व इतिहासकालीन व्यक्तिरेखांवर तर लिहिलेच पण वर्तमानाविषयीही ते उदासीन नव्हते. पद्मश्री विखे पाटील आणि पुरुषोत्तम अण्णा पाटील या सहकार क्षेत्रातील व्यक्तींवर त्यांनी अनुक्रमे ‘लढत’ ही कादंबरी आणि ‘पुरुषोत्तमनामा’ हे उत्तम चरित्र लिहिले. पण सावंत यांना चरित्रकार म्हणून ओळखले जात नाही, हा त्यांच्यावरचा अन्यायच आहे. ‘तुकाराम दर्शन’ हे माझे पुस्तक वाचून संत तुकाराम यांच्यावर आपण मिळून काहीतरी करू असे पत्र त्यांनी मला लिहिले होते. पण ते लिखाण होऊ शकले नाही.’’
‘नवतेच्या दबावाखाली असलेल्या समीक्षकांनी सावंत यांची दखल घेतली असती, तर साहित्याच्या श्रेष्ठतेचे नवे निकष त्यांना सापडले असते,’ असे जोशी यांनी सांगितले.