बैलगाडा शर्यती भविष्यात थांबवायच्या नसतील, तर बैलगाडा मालक असलेल्या उमेदवारालाच निवडून द्या, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आपल्या ब्लॉगमधून शुक्रवारी खरपूस समाचार घेतलाय. मतांसाठी शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा नवा व्यवसाय सुरू केलाय का राष्ट्रवादी काँग्रेसने, असा सवालही अजित पवार यांना विचारण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी जुन्नरमध्ये पक्षाच्या सभेत शिरूर मतदारसंघातील पक्षाचा लोकसभेसाठीचा उमेदवार जाहीर केला. त्या सभेमध्ये अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवर आढळराव-पाटील यांनी हल्लाबोल केला. ब्लॉगवरील ‘अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये आढळराव-पाटील म्हणतात, बरीच धापवळ आणि शोधाशोध केल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार सापडला आणि त्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंमत्री महाशयांनी केली. तेव्हा त्यांना अचानक बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालक वगैरे गोष्टींची आठवण झाली. बैलगाडा शर्यती भविष्यात थांबवायच्या नसतील, तर बैलगाडा मालक असलेल्या उमेदवारालाच निवडून द्या, अशी सूचनावजा दमच त्यांनी शेतकऱ्यांना भरला. अहो, अजित पवार जनाची नाही, पण मनाची तरी थोडी बाळगा… नेमका निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतींचा विषय आठवतो का? मतांवर डोळा ठेवून किती घाणेरडं राजकारण कराल. बैलगाडा शर्यतींविरोधात २००५ पासून रण पेटले होते. कोर्टकचेऱ्या चालू होत्या, बंदी उठवण्यासाठी मागणी होत होती आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे गायब झाला होतात. अहो, इतकंच काय, दोनवेळा तुमच्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. तेव्हा मंत्रिमंडळामध्ये असताना मूग गिळून का बसला होता?, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला.
अजित पवार दुतोंडी, दुटप्पी असल्याचा आरोप करून आढळराव म्हणतात, अजित पवारांनी आधी शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना हाकलवून लावले. त्यांचा अपमान केला. त्यांना चालते व्हा म्हणाले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पुळका आलाय त्यांना. ज्यांना तुम्ही ‘चालते व्हा’ म्हणालात ती मंडळी आणि ते बैलगाडा मालक, शेतकरी तुम्हाला ‘चालते व्हा’ म्हटल्याशिवाय राहणार नाहीत, असेही आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे.
http://shivajiraoadhalrao.wordpress.com/