कधी निरभ्र आकाशामुळे थंडी, तर कधी ढगांमुळे उबदार स्थिती यामुळे पुण्यात हिवाळा सुरू झाल्यानंतरही संसर्गजन्य आजारांमध्ये घट झालेली नाही. उलट दिवसा ऊन आणि रात्री बोचरी थंडी अशा विषम तापमानामुळे नेहमीच्या सर्दी-पडसे-ताप या संसर्गजन्य आजारांबरोबरच गोवर-कांजिण्यांचेही रुग्ण आतापासूनच आढळू लागले आहेत. शहरात रोज आढळणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही कमी झालेली नाही.
पुण्यात दिवाळीमध्ये थंडीची चाहूल लागली खरी, पण मध्येच ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार सुरूच आहे. या आठवडय़ात पारा १२ अंशांच्या आसपास पोहोचला. मात्र, त्यात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कायम आहे.
महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. शाम सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ९५ रुग्ण सापडले असून जानेवारीपासून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ५३२ आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग विशेषज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे यांनी सांगितले, ‘‘जून ते सप्टेंबर या काळात पाऊस सुरू असताना डेंग्यूचे फारसे रुग्ण दिसले नव्हते. पण तापमानातील चढउतारांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण खूप वाढले आहे. पुढच्या मे व जूनपर्यंत डेंग्यूचे रुग्ण आढळत राहतील. विषम वातावरणात सर्दी-पडसे, खोकला इन्फ्लुएन्झा (फ्लू) या आजारांमध्येही वाढ झाली आहे. हे आजारही नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच सर्वाधिक आढळतात. गोवर आणि कांजिण्या हे आजार पूर्वी प्रामुख्याने उन्हाळ्यात दिसत असत. परंतु या आजारांचे रुग्णही आतापासूनच आढळू लागले आहेत.’’
सर्दी-खोकला हे नेहमीचे आजार लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहेत, तर गोवर, कांजिण्या आणि फ्लू हे आजार १५ ते २५ या वयोगटात सर्वाधिक आढळून येत आहेत. अधिक काळ घराबाहेर हिंडावे लागणाऱ्या व्यक्तींमध्ये डेंग्यूचे प्रमाण अधिक आढळून येत आहे.
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी काय करायचे?
१. जिथे खूप माणसे येत असतात, तिथे डोळे आलेल्या माणसाने जाऊ नये. डोळे आलेल्या माणसाला दूर ठेवावे. बाजारात मिळणारी बोरीक पावडर कपभर पाण्यात चिमूटभर टाकायची व उकळायचे. ते थेंब थंड करून डोळय़ात टाकणे.
२. पुदिना, आले, लसूण, ओळी हळद, तुळशीची पाने व मिरपूड हे पदार्थ जेवणात घेतले तर ताप दूर ठेवता येतो. मीठ व हळद घालून गरम पाण्याच्या गुळण्या.
३. घशाचा संसर्ग टाळण्यासाठी काळे मनुके स्वच्छ धुवून खाणे.
– वैद्य प. य. खडीवाले

डेंग्यूबाबत डॉक्टरांनी केलेल्या सूचना :
– डेंग्यूचा डास साठवलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो तसेच तो प्रामुख्याने दिवसा चावतो. डासोत्पत्ती टाळण्यासाठी घरात अथवा घराजवळ शक्यतो पाणी साठवून ठेवू नये. पाणी साठवल्यास ते झाकून ठेवावे.
– घराच्या आसपास रिकामी डबडी, कुंडय़ा, टायर्स असा कचरा पडू देऊ नये. पाण्याच्या टाक्या, लिफ्टचे डक्ट या जागांचीही डासांची पैदास टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करावी.
– गोवर, कांजिण्या झाल्यास इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गर्दीत जाणे टाळा.
– सर्दी, ताप, खोकला हे संसर्ग टाळण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास नक्कीच मदत करतील.