माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे स्वीय सचिव आणि प्रशासकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणारे सर चंद्रिका प्रसाद ऊर्फ सी. पी. श्रीवास्तव (वय ९३) यांचे इटलीतील जिनिव्हा येथे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सहजयोग ध्यान परिवाराच्या संस्थापिका स्वर्गीय माता निर्मलादेवी यांचे ते पती होत.
सी. पी. श्रीवास्तव यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये उच्च पदे भूषविली होती. १९६४ ते १९६६ या काळामध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे स्वीय सचिव असलेले श्रीवास्तव हे अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होते. ताश्कंद कराराच्यावेळी ते उपस्थित होते. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सन्मान प्रदान करून केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. इंग्लंडच्या राणीकडून त्यांना सर हा किताब देण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००५ मध्ये त्यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. श्रीवास्तव यांची ‘राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम : शास्त्री’ आणि ‘भ्रष्टाचार’ ही पुस्तके गाजली. भ्रष्टाचार या पुस्तकातून त्यांनी भ्रष्टाचाराची कारणे आणि उपाययोजना यावर प्रकाशझोत टाकला आहे. इंटरनॅशनल मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे ते संस्थापक होते.