राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारमधील पुणे- सातारा टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाचे ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झालेले काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना या कालावधीत हे काम पूर्ण न झाल्याने पुढे टप्प्याटप्प्याने वर्षभर मुदत देण्यात आली. मात्र, आता रस्त्याच्या कंत्राटदाराकडून पुन्हा तब्बल दीड वर्षांची मुदतवाढ मागण्यात येत आहे. त्यामुळे मूळ अडीच वर्षांच्या कामाला तब्बल अडीच वर्षांची मुदतवाढ, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनचालकांचे हाल होत असतानाही या रस्त्यावरील टोलच्या दरांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढच होत आहे.
पुणे- सातारा रस्त्याच्या देहूरोड ते सातारा या सुमारे १४० किलोमीटरच्या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामाबद्दल सजग नागरी मंचच्या संजिवनी महाजन यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून मुदतवाढीची ही बाब स्पष्ट झाली आहे. मुदतीत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने नागरिकांना होणारा त्रास, वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा वाढलेला वापर लक्षात घेता यात नागरिकांचेच मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असल्याने तातडीने या रस्त्यावरील टोलची वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.
सहापदरीकरणाच्या कामासाठी सुरुवातीला ९१२ दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ३१ मार्च २०१३ रोजी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मुदत संपल्यानंतर वेळोवेळी या कंत्राटदाराने मुदतवाढ मागितली. त्यानुसार मुदतवाढही देण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत सुमारे वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली असली, तरी सद्यस्थितीत या रस्त्याचे सुमारे साठ टक्केच काम पूर्ण झाले आहे. आता कंत्रटदाराने हे काम पूर्ण होण्यासाठी ५ ऑक्टोबर २०१५ पर्यंतची मुदत मागितली आहे. या कामाची मूळ मुदत ९१२ दिवसांची होती, मात्र त्याला मूळ मुदतीपेक्षाही अधिक म्हणजे ९१९ दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे. सातत्याने मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच या कामाच्या कालावधीत चार वेळा टोलची दरवाढ करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळेच या कामाला उशीर होत असल्याचा आरोप कंत्राटदाराकडून होत आहे. मात्र उशीर कोणाच्याही मुळे झाला असला, तरी त्याचा भरुदड नागरिकांना बसत असल्याने या रस्त्यावरील टोल बंद करून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी सजग नागरी मंचने केली आहे.