हातात मोबाईल आहे.. टचस्क्रिन.. खूप सारं काही असलेला. पण तो वापरायचा कसा, ही मुलं दिवसभर फोन घेऊन करत काय असतात, मोबाईलवरही आता टीव्ही बघता येतो म्हणे, ते व्हॉट्स अॅप काय असतं.. हे ज्येष्ठ नागरिकांना पडणारे प्रश्न आहेत. ज्येष्ठांना पडणाऱ्या या प्रश्नांची संधी उचलून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट फोन वापरण्याचे वर्ग चालवण्याचा नवा व्यवसाय बाजारपेठेत रुजला आहे.
स्मार्ट फोन्स हे बाजारपेठेने आणि ग्राहकाने स्वीकारूनही वर्षे लोटली आहेत. त्यातही टचस्क्रिन फोन्सचा ट्रेंड! फक्त फोनवर बोलणे किंवा एसएमएस अशा प्राथमिक वापरापुरतेच फोन्स आता जवळपास मिळेनासेच झाले आहेत. मनोरंजन, संपर्क याबरोबरच दैनंदिन व्यवहारातील बिले भरणे, खरेदी, रिझर्वेशन्स हे सगळेच फोनच्याच माध्यमातून होत असते. त्यामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्याच हाती स्मार्ट फोन्स आहेत. हातात अद्ययावत फोन आहे. मात्र, तो वापरायचा कसा हे मात्र कळत नाही. हा ज्येष्ठ नागरिकांना पडणारा प्रश्न. या प्रश्नावरही बाजारपेठेनेच उत्तर दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट फोन वापरण्याचे क्लासेस सुरू झाले आहेत.
स्मार्ट फोन म्हणजे काय, अॅप्लिकेशन म्हणजे काय, फोन कसा वापरायचा, व्हॉट्स अॅप कसे वापरायचे, व्हिडिओ कॉल कसा करायचा, व्हिडिओ, गाणी डाऊनलोड कशी करायची, पुस्तक डाऊनलोड कशी करायची, सुरक्षेसाठी आवश्यक अॅप कोणती, ती कशी वापरायची, स्मार्ट फोनचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करता येतो, फोनवर इंटरनेट कसे वापरायचे, बँकेचे व्यवहार कसे करायचे, ते करताना काळजी काय घ्यायची, खरेदी कशी करायची, त्यासाठी कोणती अॅप्स आहेत यापासून ते हँडसेटची काळजी कशी घ्यायची असा फोनच्या वापराबाबतचा एक अभ्यासक्रमच या क्लासेसनी तयार केला आहे. साधारणपणे एक ते तीन महिने या कालावधीसाठी हे क्लासेस चालवण्यात येतात. अगदी पाचशे रुपयांपासून हे वर्ग सुरू आहेत. काही क्लासेसनी स्मार्ट फोन्सच्या वापराबरोबरच संगणक प्रशिक्षण, इंटरनेट वापराचे प्रशिक्षण, स्काईप कसे वापरावे याचेही प्रशिक्षण देण्याच्या जाहिराती केल्या आहेत.