‘‘आकुर्डीतील बहिणाबाई प्राणिसंग्रहालयास प्राणिसंग्रहालय म्हणून मान्यता असली तरी कात्रज प्राणिसंग्रहालयाप्रमाणे तिथेही सापांसाठी ‘रेस्क्यू’ केंद्र गरजेचे आहे. मात्र हे केंद्र त्यांनी दुसऱ्या ठिकाणी केल्यास चांगले होईल,’’ असे मत उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी व्यक्त केले.

बहिणाबाई संग्रहालयात २० सापांच्या झालेल्या मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर विचारणा केली असता गुजर म्हणाले, ‘‘या प्रकरणाचा पंचनामा झाला असून तिथे व्यवस्थापनातील दुर्लक्ष असल्याचे दिसते. या प्राणिसंग्रहालयास मनुष्यबळाची कमतरता आहे, तसेच अनेकदा प्राणिसंग्रहालयांकडे येणारे साप जखमी व मरणासन्न असतात.’’ कात्रज प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू’ केंद्राप्रमाणे बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातही ‘रेस्क्यू’ केंद्र सुरू करता येईल.

अशा केंद्रात जखमी सापांवर उपचार केले जातात, परंतु ते नागरिकांना दाखवण्यासाठी ठेवले जात नाहीत. कात्रज हे एकटेच ‘रेस्क्यू’ची गरज भागवण्यास पुरेसे नाही.

चौधरी प्राणिसंग्रहालयास तशी सूचनाही करण्यात आली असून ते या केंद्रासाठी परवानगी मागणार आहेत. मात्र हे केंद्र दुसऱ्या ठिकाणी करायला हवे, असेही गुजर यांनी सांगितले.

कात्रज प्राणिसंग्रहालयाकडे पुरेशा सुविधा

कात्रजच्या ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालया’कडे प्राण्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध असून पुरेसे मनुष्यबळही आहे, असे संग्रहालयाचे संचालक कराजकुमार जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधीकरणाच्या निकषांचे पालन केले जात असून अद्याप आमच्याकडे असा प्रकार झालेला नाही. कात्रज संग्रहालय देशातील एक आधुनिक संग्रहालय असून प्राण्यांच्या आवश्यक असलेल्या सुविधा, जागा व वैद्यकीय सुविधा आमच्याकडे आहेत.’’