अरूंद मार्गामुळे वाहतूक कोंडी; शहरातील १० रस्त्यांचे सर्वेक्षण

शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मुळातच अरूंद असताना ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहराच्या काही प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. मात्र त्यामुळे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यासह टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता, फग्र्युसन रस्ता आदी रस्ते वाहतुकीसाठी अरूंद होणार आहेत. त्याबाबतचा आढावा घेणारी ही वृत्तमालिका..

जंगली महाराज रस्त्याच्या पुनर्रचनेमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा अनुभव ताजा असतानाच आता लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, फग्र्युसन, केळकर, शिवाजी रस्ता या रस्त्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुनर्रचनेसाठी या प्रमुख रस्त्यांसह एकूण १० रस्त्यांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातील काही रस्तेही वाहतुकीसाठी अरूंद होणार असून रस्त्यांची पुनर्रचना वाहनचालकांच्या दृष्टीने त्रासदायक ठरणार आहे.

शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या विविध कामे सुरु आहेत. त्यानुसार ‘मॉडेल रोड’ या संकल्पनेनुसार जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स अंतर्गत जंगली महाराज रस्त्याचे काम सुरु झाले आहे. मॉडर्न कॅफे चौकापासून ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहेत. मात्र सुशोभीकरण आणि पुनर्रचनेच्या नावाखाली जंगली महाराज रस्त्याची कशी वाट लागली आहे, हे स्पष्ट झालेले असतानाच आणखी दहा रस्ते पुनर्रचनेच्या नावाखाली अरूंद करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे.

शिवाजी रस्ता (सिमला ऑफिस ते मंडई), शिवाजी रस्ता (मंडई ते स्वारगेट), फग्र्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, टिळक, केळकर, बाजीराव, बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्ता, सोलापूर रस्ता या रस्त्यांची पुनर्रचना प्रस्तावित आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध कामे करण्यात येतील, असा दावा केला जात असला तरी तो फोलच ठरणार आहे. मुळातच हे रस्ते वाहतुकीसाठी अरूंद आहेत. शहरातील खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावरून चालणेही अडचणीचे ठरते. त्यातच हे रस्ते अरूंद होणार आहेत. या रस्त्यांवर सलग पदपथ आणि काही ठिकाणी सायकल मार्गही तयार करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मध्यवर्ती भागातील हे रस्ते अरूंद झाल्यास वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवणार आहे. एकूण १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची ही पुनर्रचना होणार आहे. त्यात पदपथांचाही समावेश आहे. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून रस्त्यांचे आराखडे करण्याचे काम अंतिम टप्प्यातही आले आहे.

जंगली महाराज रस्ता सुशोभीकरण आणि पुनर्रचनेच्या नावाखाली खोदण्यास सुरुवात झाल्यानंतर शहरातील प्रमुख असलेल्या या रस्त्याची मोडतोड करण्यात आल्यामुळे त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जंगली महाराज रस्त्यावरील पदपथ मोठे करण्यात आले असले तरी त्यावर अतिक्रमणे वाढली आहेत. तर सायकल मार्गाचा वापरही चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुशोभीकरणाचे आणि पुनर्रचनेचे महापालिकेचे धोरण पुणेकरांसाठी अडचणीचे ठरणार आहे.