महाविद्यालयाच्या ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात स.प. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाविद्यालयाने कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता सूची तयारच न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळींशी संलग्न असलेल्या स.प. महाविद्यालयाने गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता तयार केलेली नाही. त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांची भरतीच होऊ शकली नाही. नियमित कर्मचाऱ्यांऐवजी महाविद्यालयाने कंत्राटी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती केली. सेवा ज्येष्ठता सूचीच तयार न केल्यामुळे कर्मचाऱ्यांची मान्यता, पदोन्नती, सेवा निवृत्तीचे लाभ यांबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे जिल्हा-पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संघातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे.
याबाबत संघटनेचे सचिव दिलीप गुरव यांनी सांगितले, ‘गेली अनेक वर्षे काम करूनही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ८ ते १० हजार महिना असे वेतन दिले जाते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेला आणि महाविद्यालयाला वारंवार अर्ज करून झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेली दहा वर्षे प्रलंबित आहेत. मात्र, त्याकडे संस्थेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पर्याय स्वीकारला आहे. संस्थेने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवेपर्यंत शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाचे कोणतेही काम करणार नाहीत.’