‘विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,’ अशी सूचना स.प. महाविद्यालयात गुरुवारी लावली असली तरी विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही अस्वस्थता आहे. मंडळ आणि महाविद्यालयाच्या वादामध्ये आमची काय चूक, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
विभागीय शिक्षण मंडळाने स.प. महाविद्यालयाची मान्यता काढून घेतल्याने, तिथे बारावीला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ज्या विद्यार्थ्यांवरून हा वाद निर्माण झाला, तो विद्यार्थी आम्हाला माहीत नाही. मंडळाचे नियम किंवा महाविद्यालयाची भूमिका यामध्ये चूक कोण, बरोबर कोण यांचा विचार आम्ही का करायचा? परीक्षेला दोन महिने राहिलेले असताना आम्हाला परीक्षेला बसता येणार की नाही याचा ताण आम्हाला का? महाविद्यालयाच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची?’ अशा भावना स.प. मधील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सूचना फलकावरील सूचना आणि वृत्तपत्रांवरील बातम्या याखेरीज कोणतीही माहिती मिळत नसून महाविद्यालयामध्ये शिक्षकांकडून आम्हाला काही सांगण्यात आलेले नाही, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
या प्रकरणामागील विविध शक्यता
खोटे गुणपत्रक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात महाविद्यालयाने तक्रार करायची, की मंडळाने या तांत्रिक मुद्दय़ापासून हा वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहेत.
१) महाविद्यालयामध्येच खोटय़ा गुणपत्रकांचे वाटप झाले का?
मंडळाने तब्बल वीस वेळा आदेश देऊन आणि मंडळाचे आदेश मानणे बंधनकारक असतानाही महाविद्यालयाने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. महाविद्यालय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का? महाविद्यालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यास वाद उद्भवलाच नसता, असे मंडळाचे म्हणणे आहे.
२) खोटी गुणपत्रके तयार करणारी साखळी आहे का?
मंडळाकडून गुणपत्रके वाटण्याच्याच दिवशी महाविद्यालयाला मिळतात, महाविद्यालयाकडे गुणपत्रके आल्यानंतर पुढील काही तासांमध्ये ती विद्यार्थ्यांना वाटली जातात. त्यामुळे खोटय़ा गुणपत्रकाशी महाविद्यालयाचा संबंध नाही, अशी महाविद्यालयाची भूमिका आहे. इतर कोणत्याही महाविद्यालयामधून किंवा यापूर्वी कधीही अशी तक्रार आली नसल्याचे मंडळाने सांगितले. ‘खोटे गुणपत्रक कसे तयार झाले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ते पोलिसांचे काम आहे. मात्र, पोलिसांनी शोध घेण्यासाठी मुळात महाविद्यालयाने तक्रार दाखल करणे आवश्यक आहे,’ असे मंडळाचे म्हणणे आहे.
३) महाविद्यालय आणि मंडळामध्ये काही जुना वाद आहे का?
मंडळाकडून मान्यताच काढून घेण्याची कारवाई यापूर्वी झालेली नाही. मात्र, वरकरणी तांत्रिक वाटणाऱ्या मुद्दय़ावरून मंडळाने महाविद्यालयाची मान्यता काढून घेतली आहे. गेले वर्षभर विविध प्रशासकीय संस्थांशी वाद असल्यामुळे स.प. महाविद्यालय चर्चेत आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल?
स.प. महाविद्यालयाची विभागीय मंडळाने मान्यता काढून घेतली असली, तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी काही मार्ग खुले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या काही सदस्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. विशेष बाब म्हणून या वर्षीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी मिळू शकते. दुसऱ्या महाविद्यालयाने आणि मंडळाने मान्यता दिल्यास या विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयामधून परीक्षेला बसवता येऊ शकते. या विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ष तांत्रिकदृष्टय़ा गॅप म्हणून गृहीत धरून बहि:स्थ विद्यार्थी म्हणून स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येऊ शकते.