शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेत शुल्क भरण्यासाठी ‘ऑनलाइन पेमेंट’ची व्यवस्था महत्त्वाची ठरत आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे प्रवेशाची प्रक्रिया वेगवान झाली असून रोज प्रवेश दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडशेने वाढ झाल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली.

गेल्या काही काळात ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले असल्याचे अनेक अहवालांतून सातत्याने दिसून आले आहे. त्यात शैक्षणिक संस्थाही मागे राहिलेल्या नाहीत. अनेक संस्थांनी पॉस मशिन उपलब्ध करण्याबरोबरच ऑनलाइन कॅश ट्रान्सफरचा पर्यायही पालकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अर्जाची तपासणी आणि प्रवेश निश्चिती केल्यावर पुढील प्रक्रियेसाठी त्यांना वेळ द्यावा लागत नाही. पूर्वीप्रमाणे महाविद्यालयांमध्ये शुल्काचे चलन घेण्यासाठीच्या रांगा लावण्याची गरज राहिलेली नाही. मात्र, अद्याप काही महाविद्यालये पारंपरिक पद्धतीने शुल्क घेतले जात असल्याचेही दिसून येत आहे.

‘ऑनलाइन पेमेंट’मुळे बऱ्यापैकी सोय आणि प्रक्रिया वेगवान झाली आहे. कागदपत्रांच्या तपासणीतच जो काही वेळ लागेल तेवढाच वेळ थांबावे लागते. महाविद्यालयातून चलन घेऊन बँकेत जाऊन शुल्क भरावे लागत नाही हे चांगले आहे, असे काही पालकांनी सांगितले.

ऑनलाइन पेमेंटचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. विशेषत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षीपर्यंत आम्ही एका दिवसात जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांचे प्रवेश करू शकत होतो. यंदा ते प्रमाण चारशेच्या पुढे गेले आहे. वेळेची बचत होत असल्याने जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे शक्य झाले आहे.

– डॉ. दिलीप शेठ, प्राचार्य, स. प. महाविद्यालय