कोथरूड उड्डाणपुलाजवळ उभ्या राहिलेल्या केदार एम्पायर या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा पूर्णत: बोजवारा उडाला असून येथे पुनर्वसन केलेल्या सत्त्याहत्तर कुटुंबांचे अतोनात हाल सुरू आहेत. या इमारतीत अनेक बेकायदा बांधकामांसह व्यावसायिकांची अतिक्रमणे झाली असून इमारतीला लिफ्ट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
केदार एम्पायरमधील अतिक्रमणांची तसेच बांधकामांमधील अनियमिततेची माहिती स्थानिक नगरसेवक प्रशांत बधे तसेच नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी मंगळवारी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) ही अकरा मजली इमारत उभी करण्यात आली असून मूळच्या ७७ झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन या इमारतीमधील तिसऱ्या ते नवव्या मजल्यापर्यंत करण्यात आले आहे. मात्र, इमारतीच्या पहिल्या दिवसापासून लिफ्ट नसल्यामुळे रहिवाशांचे येथे फार मोठे हाल होत आहेत, असे येथे पाहायला मिळाले. इमारतीच्या तळघरात लिफ्टसाठी जागा करण्यात आली असली, तरी त्यात वेगळीच उपकरणे ठेवल्याचेही दिसले.
या इमारतीमधील सर्व निवासी गाळे वेगवेगळ्या आकारांचे असून त्यांचे आकारही त्रिकोनी तसेच वेडेवाकडे आहेत. काही घरांच्या मध्येच सिमेंटचे खांब उभे आहेत. रहिवाशांसाठी म्हणून जे रस्ते दाखवण्यात आले होते, त्यातील एक रस्ता एका व्यावसायिकाला वाहन उद्योगासाठी विकण्यात आला असून दुसरा रस्ता फक्त तीन फूट उरला आहे. इमारतीमधील पार्किंगचाही बेकायदा वापर सुरू असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहन विक्रीचा उद्योग सुरू आहे. रहिवाशांना मात्र पार्किंगसह अन्य कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, असे बधे यांनी सांगितले. या योजनेतील बालवाडीसाठी दिलेली जागाही एका व्यावसायिकाला विकण्यात आली आहे. इमारतीच्या तळमजल्यांवर ऑइलचेही साठे असल्याची तक्रार आहे.
या झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत विकसकाला दिलेला टीडीआर थांबवावा आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, असेही पत्र बधे आणि बोडके यांनी मंगळवारी आयुक्तांना दिले आहे.
..तर कारवाई करणार
संबंधित इमारत व बांधकामाबाबत काही प्रश्न आहेत तसेच तक्रारीही आल्या आहेत. इमारतीत नकाशाबाह्य़ बांधकामे झाली आहेत तसेच काही अनियमितता आहेत. त्याबाबत पाहणी करून कारवाई केली जाईल. या प्रकाराबाबत संबंधितांना नोटीसही देण्यात आली आहे. तसेच जरी टीडीआर दिलेला असला, तरी अनियमितता आढळल्यास तो थांबवण्याचीही तरतूद कायद्यात आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ही इमारत बांधून महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. त्यासाठीचे भोगवटापत्रही मिळाले आहे. इमारतीत जी बेकायदा बांधकामे झाली असतील त्यावर महापालिकेने कारवाई करावी, असे केदार असोसिएटसचे भागीदार सूर्यकांत निकम यांच्याकडून सांगण्यात आले.