दहावीच्या वाढलेल्या निकालाचा आनंद ओसरून आता प्रवेश कसा मिळणार याची चिंता पालकांना भेडसावू लागली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाहीच तर.. या धास्तीने व्यवस्थापन कोटय़ातूनच प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांकडून आतापासूनच चाचपणी होऊ लागली आहे.
या वर्षी दहावीच्या वाढलेल्या निकालांनी अकरावी प्रवेशाचा कट ऑफ वाढणार आहे. या वर्षी शहरातील महाविद्यालयांचे कट ऑफ हे २ ते ३ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पुण्याजवळील ग्रामीण भागाचा निकालही वाढला आहे. परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात येण्याकडे ओढा असतो. बाहेरून पुण्यात प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही या वर्षी वाढण्याची शाक्यता आहे. विशिष्टच महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी हटून असणाऱ्या पालकांनी आतापासूनच व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेशाची चाचपणी सुरू केली आहे. दरवर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दोन फेऱ्या झाल्यानंतर व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेशासाठी पालकांकडून चाचपणी सुरू होते. मात्र, या वर्षी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात पुण्यातील नामांकित शिक्षणसंस्थांच्या कार्यालयात प्रवेशासाठी पालकांची जा ये सुरू झाली आहे.
त्यातच या वर्षीही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्या महाविद्यालयात नेमक्या किती जागा शिल्लक आहेत, त्याची माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे सांगणाऱ्यांना पालक फशी पडले होते. या वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

अकरावीच्या प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या भागात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांना किमान ४० आणि कमाल ५० महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरावेत. महाविद्यालयांचे आदल्या वर्षीचे कट ऑफ गुण, शुल्क, घरापासूनचे अंतर, अनुदानित किंवा विनाअनुदानित तुकडी या सर्व घटकांचा विचार करून प्राधान्यक्रम द्यावेत. सर्व प्राधान्यक्रम विचार करून भरावेत, असे आवाहन प्रवेश समितीने केले आहे.

महाविद्यालयांचे गेल्या वर्षीचे कट ऑफ
विज्ञान शाखा
महाविद्यालय                 कटऑफ
आपटे प्रशाला              ९५.४ टक्के
जयहिंद (पिंपरी)          ९४.२ टक्के
फग्र्युसन                     ९४ टक्के
हुजूरपागा                    ९२.६ टक्के
स. प. महाविद्यालय        ९०.८ टक्के
मॉडर्न, शिवाजीनगर        ९०.६ टक्के
आबासाहेब गरवारे        ९०.६ टक्के
एमएमसीसी                 ९०.४ टक्के
नवरोसजी वाडिया         ८८ टक्के
सिंहगड (अंबेगाव बुद्रुक)    ८४.२ टक्के
—–
कला शाखा
महाविद्यालय                     कटऑफ
फग्र्युसन                         ९२.४ टक्के
सिम्बायोसिस                    ८९.८ टक्के
स. प. महाविद्यालय           ८४ टक्के
मॉडर्न, शिवाजीनगर           ७४ टक्के
नवरोसजी वाडिया               ७२.८ टक्के
——
वाणिज्य शाखा
महाविद्यालय                     कटऑफ
बीएमसीसी                    ९२.८ टक्के    
सिम्बायोसिस                  ८६.८ टक्के
एसएम चोक्सी                ८६ टक्के
स. प. महाविद्यालय            ८२.८ टक्के
गरवारे                          ८८.२ टक्के