िपपरी महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर आपल्या समर्थकाला बसवून स्वत:कडे ‘रिमोट कंट्रोल’ ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्येच ‘अर्थपूर्ण’ स्पर्धा सुरू आहे. मंगळवारी उमेदवार जाहीर होणार असल्याने शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. महिला, ओबीसी, अमराठी की अन्य कोणी असे तर्कवितर्क सुरू आहेत.
अध्यक्षपदाची निवडणूक पाच मार्चला होणार असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. समितीत १६ पैकी १२ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. इतके स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार आहे. विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने विरोधी अर्जही येणार नाही. बिनविरोध अध्यक्षपद मिळणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. निर्णयाधिकारी अजित पवार यांचा कौल मिळवण्यासाठी सर्वाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाचा कोणीतरी ‘गॉडफादर’ आहे. आपल्या समर्थकाला अध्यक्षपद मिळवून देत स्वत:कडे ‘रिमोट कंट्रोल’ ठेवण्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे मनसुबे आहेत. एका इच्छुकाचे नियंत्रण शिवसेनेच्या नेत्याकडे आहे. स्थायीचे सदस्य निवडताना अजितदादांनी कोणाचे काही चालू दिले नाही. उमेदवारांची नावे स्थानिक नेत्यांऐवजी त्यांनी स्वत:च्या स्वीय सहायकांच्या माध्यमातून जाहीर केल्याने पक्षात अस्वस्थता पसरली होती. अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत अजितदादांचा कौल स्पष्ट होत नसल्याने अंदाज व्यक्त करण्यापलीकडे कोणी काही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.