४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार पुणे बारामती लोकसभा मतदारसंघांची निवडणूक अधिसूचना गुरुवारी (२८ मार्च) प्रसिद्ध होत आहे. त्यानुसार या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.

राज्यात चार टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यात पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या, तर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तर बारामती मतदारसंघासाठी अपर आयुक्त (पुणे) सुभाष डुंबरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावरील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात, तर बारामती मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांना विधानभवनात अर्ज सादर करता  लागणार आहेत.

उमेदवारांसाठी आयोगाने केलेले नियम

* उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारासह केवळ चार व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

*  निवडणुकीत खर्च करण्यासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते क्रमांक देणे आवश्यक करण्यात आले आहे.

*  ‘एबी’ अर्ज उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी (४ एप्रिल) दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक असून, हा अर्ज मूळ प्रत या स्वरूपात स्वीकारला जाणार आहे.

*  उमेदवाराने अलीकडील तीन महिन्यांपर्यंत काढलेल्या छायाचित्राच्या पाच प्रती सादर करायच्या असून, हेच छायाचित्र ईव्हीएम यंत्रांवर मतदानाच्या दिवशी असेल.

*  उमेदवारांना स्वत:बरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आणि उमेदवारावर अवलंबून असणाऱ्यांच्या नावावरील गेल्या पाच वर्षांतील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे.

*  कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील मालमत्ताही सादर .

*  उमेदवारांना स्वत:वर दाखल गुन्ह्य़ांची माहिती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापासून (८ एप्रिल) ते मतदानाच्या आधीपर्यंत (२३ एप्रिल) तीन वेळा वृत्तपत्रांत जाहीर करावी लागणार आहे.

*  उमेदवारांच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणि फ्लेक्सद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे आणि बारामती मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम 

* पुणे आणि बारामती मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना २८ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.

*  उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) ४  एप्रिलपर्यंत सादर करता येतील.

*  प्राप्त अर्जाची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे.

*  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत मुदत आहे.

*  पुणे, बारामती मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होईल.