पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका सतरा वर्षीय तरुणीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नुकतीच चाकण परिसरात घडली. तिचा मृतदेह हा विवस्त्र आढळल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

दरेकर म्हणाले, “चाकण परिसरातील १७ वर्षीय तरुणीचा खून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सामान्य नागरिकांना निर्भीडपणे जगता आलं पाहिजे. म्हणून, आज अपर पोलीस आयुक्तांची भेट घेतली यातून पीडित तरुणीला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे.”

राज्यात कायद्याचा धाक कमी झालेला दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, त्यामुळे अशा क्रूर घटना घडत आहेत. तरुणीसोबत अघटित असं काही घडलेलं नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरुणीच्या अंगावर व्रण आहेत त्यामुळे पोलीस चांगल्या पद्धतींने तपास करतील. आज चाकण परिरात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाइकांनी केली. कायद्यापुढे कोणी मोठं नाही असा संदेश पोलिसांच्या कारवाईतून जावा अशी अपेक्षा देखील दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.