राज्यात १७५ सहकारी साखर कारखाने आहेत, त्यांपैकी १०७ कारखाने सद्यस्थितीला चालू आहेत. यातून या व्यवसायाची सध्याची परिस्थिती स्पष्ट होते. त्यामुळे आपण आता स्वतः आर्थिकदृष्ट्या बलवान होण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

लोकसत्ताच्यावतीने पुण्यात आयोजित साखर परिषदेमध्ये ‘साखर उद्योगासमोरील आव्हाने’ या विषयावर पवार बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे हे मान्यवर उपस्थित होते.

आपल्या राज्यात कित्येक वर्षांपासून साखर कारखानदारी सुरू आहे. तरीदेखील आजपर्यंत हा उद्योग स्वतः च्या पायावर उभा राहू शकला नाही, अशा शब्दांत पवार यांनी यावेळी खंत व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, दरवेळी केंद्र, राज्य सरकार आणि साखर संचालक यांच्याकडे निधीची मागणी केली जाते. यामुळे आता आपल्या सर्वांना वेगळा विचार करण्याची वेळ आली असून येत्या काळात स्वतःचा निधी कसा निर्माण होईल या दृष्टीने कारखान्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी साखर कारखानदारांना केले. यामुळे सरकार आणि बँकांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.