रस्त्यावरील राडारोडा, मातीचे ढिगारे, अनधिकृत फ्लेक्स, पोस्टरवर कारवाईचे आदेश

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर शहर ‘स्वच्छ’ ठेवण्यासाठी महापालिका सरसावली आहे. रस्त्यावरील राडारोडा, मातीचे ढिगारे, अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत. महापौरांनी प्रशासनाला दिलेले आदेश स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाश्र्वभूमीवर दिल्याचे स्पष्ट होत असून या आदेशामुळे महापालिकेच्या स्तरावरही येत्या काही दिवसांमध्ये धावपळ दिसून येणार आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी प्रस्तावित आहे. महापालिकेकडून त्याबाबतची धावपळही सुरू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेत शहर विकासाचा आणि एकूणच स्वच्छतेचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त, पाणीपुरवठा, पथ विभाग, ड्रेनेज, आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांवर, झोपडपट्टय़ांलगत असलेला राडारोडा, पदपथांवर पडलेले ब्लॉक्स, मातीचे ढिगारे त्वरित उचलून घ्यावेत. महापालिका सहायक आयुक्त आणि संबंधित मुख्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दक्षता घ्यावी.

महापालिका सहायक आयुक्तांनी संबंधित खातेप्रमुखांशी चर्चा करून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांची त्या-त्या विभागाशी समन्वय साधून कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत. कामे पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नयेत. शहरात अनधिकृतपणे फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात खटले दाखल करावेत. अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकावेत. आकाशचिन्ह परवाना विभाग, अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाने ही कारवाई संयुक्तपणे करावी. शहरातील टपरीधारकांनी कचरा टाकण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे दुकानालागत किंवा टपरीलगत मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकला जातो, अशा पानटपरी चालकांविरोधात आरोग्य निरीक्षकांनी करवाई करावी, असे टिळक यांनी सांगितले.

रस्त्याच्या मध्ये येणारी, पदपथांवर आलेल्या झाडांमुळे अपघाताची शक्यता असल्यामुळे त्याबाबतची योग्य ती दक्षता उद्यान विभागाने घ्यावी, रस्ता दुभाजकांच्या मध्ये असलेली झाडे-झुडपे अनियंत्रित वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. चौकांमधील भिकाऱ्यांना नाईट शेल्टरमध्ये हलविण्यात यावे. बांधकामाचा अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा त्वरित उचलण्यात यावा, रस्त्यांची कामे सुरू असल्यास तसे फलक उभारावेत, असेही आदेश टिळक यांनी दिले आहेत.