अहमदनगरच्या एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मरण पावलेल्यांची संख्या ३४ झाली असून त्यातील १५ रुग्ण पुण्यातले होते, तर १९ रुग्ण बाहेरून उपचारांसाठी पुण्यात आले आहेत.
वडगाव-बुद्रुकला राहणाऱ्या विद्याराणी लक्ष्मण बादिमे (वय-३५) यांचा मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमार्फत करण्यात आले होते. स्वाईन फ्लूचा संसर्ग व न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि गंभीर जंतूसंसर्गामुळे अवयव निकामी होणे (मल्टी ऑर्गन फेल्युअर) यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यांच्या उपचारांना उशीर झाला नव्हता.
अहमदनगरचे नाथा धावडे (वय-७१) यांचाही मंगळवारी पुण्यात स्वाईन फ्लूवरील उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्वाईन फ्लूच्या संसर्गासह न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास होणे आणि गंभीर जंतुसंसर्ग यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा त्रास आणि रक्तक्षयही होता, अशी माहिती पालिकेने दिली. त्यांच्याही उपचारांना उशीर झाला नव्हता. सध्या स्वाईन फ्लूचे ९८ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत दाखल असून यातील २६ जणांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. याशिवाय आणखी ३५ संशयित स्वाईन फ्लू रुग्णही रुग्णालयात उपचार घेत आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे ४३६ रुग्ण सापडले असून यातील ३०५ रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत.