वेतनवाढ करार व अन्य मागण्यांवरून टाटा मोटर्समध्ये सुरू असलेला व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी यांच्यातील संघर्ष आणि कामगारांचे जेवणावरील बहिष्कार आंदोलनाने सोमवारी वेगळे वळण घेतले. टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी कंपनीला भेट दिल्यानंतर कामगारांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर टाटा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कामगारांनी आंदोलन स्थगित केले. १५ दिवसात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही टाटा व चंद्रशेखरन यांनी यावेळी दिली.

गेल्या काही दिवसांपासून कामगारांचे आंदोलन सुरू असताना पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार टाटा व चंद्रशेखरन सोमवारी सकाळीच कंपनीत दाखल झाले. तेव्हा कंपनीतील ‘लेक हाऊस’ येथे प्रमुख कामगार प्रतिनिधींना बोलावून घेण्यात आले. व्यवस्थापनाच्या वतीने टाटा, चंद्रशेखरन, सतीश बोरवणकर, मयांक पारीख तर कामगार प्रतिनिधींकडून सतीश धुमाळ, संजय काळे, सुरेश जासूद, यशवंत चव्हाण, विष्णू नेवाळे, सतीश ढमाले, राजू पाटील, बबन चव्हाण, नामदेव ढाके, सुभाष हुलावळे, सुरेश जामले आदी उपस्थित होते. जवळपास अर्धा तास बैठक चालली. चर्चेला सुरुवात करतानाच तुमचे प्रश्न सांगा, असे टाटा यांनी सांगितले. त्यानंतर, कामगारांनी त्यांचे म्हणणे विस्ताराने मांडले. तीन वर्षांपासून कंपनीतील वातावरण व्यवस्थित राहिले नाही. ‘टाटा संस्कृती’ लोप पावत आहे. कामगारांचे वेतनकरार रखडले आहे. काही अधिकारी वातावरण बिघडवतात, स्वत:चे ‘अजेंडे’ राबवतात. व्यवस्थापन कामगारांना सहकार्य करत नाहीत, असे मुद्दे कामगारांनी मांडले. सर्व मिळून मार्ग काढू, अशी ग्वाही कंपनीचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी दिली.

उन्हात बसू नका, जेवण घ्या- रतन टाटा

बैठकीत रतन टाटा यांनी कामगार नेत्यांशी संवाद साधला. कामगार भर उन्हात आंदोलन करतात, जेवण करत नाहीत हे ऐकून वाईट वाटले. तसे करू नका. जेवण घ्या, उन्हात बसू नका. कामगारांचे जे काही प्रश्न असतील, ते नक्की सोडवू. १५ दिवस आम्ही दोघेही परदेशात जात आहोत, तेथून परतल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढू, अशी ग्वाही टाटा यांनी दिली. त्यानंतर, जेआरडी टाटा यांच्या पुतळ्याजवळ तातडीची कामगार सभा घेण्यात आली. जवळपास चार हजार कामगार यावेळी उपस्थित होते. बैठकीतील चर्चेची माहिती सभेद्वारे कामगारांना देण्यात आली. टाटा यांनी आंदोलन मागे घेण्याचे व जेवण सुरू करण्याचे आवाहन केल्याचे सांगताच कामगारांनी एकमताने आंदोलन स्थगित केले व कामाला नव्या जोमाने सुरुवात केली.