राहुल खळदकर

आसाम, केरळमध्ये यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि चहाचे मळे वाहून गेले. करोनाच्या संसर्गामुळेही चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून त्यामुळे प्रतिकिलोमागे चहा पावडरच्या दरात ८० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

चहाचे उत्पादन कमी झाल्याने यंदा चहाचे दर चढेच राहणार आहेत. करोनाचा संसर्ग तसेच टाळेबंदीत चहाला मागणी कमी होती. टाळेबंदी मागे घेण्यात आल्यानंतर चहा पावडर आणि चहा विकणारी छोटी दुकाने (अमृततुल्य) सुरू झाली आहेत. अद्याप अमृततुल्य चालकांकडून चहाचे दर वाढवण्यात आले नसले तरी सामान्यांसह सर्वाना येत्या काळात चहाची दरवाढ जाणवणार आहे.

आसाम, केरळ ही दोन्ही राज्ये संपूर्ण देशाची चहाची गरज भागवितात. दक्षिणेकडील राज्याच्या तुलनेत आसामधील चहा अधिक दर्जेदार समजला जातो. शहरी भागातील ग्राहक आसाम, दार्जिलिंग येथील सीटीसी लीफ चहा वापर करतात. या चहा पावडरचे दर जास्त असतात. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून डस्ट पावडरला मागणी असते. या चहाचे दर कमी असतात. एक किलो चहा पत्तीचे (सीटीसी लीफ) दर पूर्वी प्रतवारीनुसार १८० ते ३५० रुपये असे होते. चहाचे उत्पादन कमी झाल्याने चहापत्तीचे एक किलोचे दर ३९० ते ४८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

डस्ट पावडर प्रकारातील चहा दक्षिणेकडील राज्यातून विक्रीस पाठविण्यात येतो. पूर्वी डस्ट पावडरचा प्रतिकिलोचा दर प्रतवारीनुसार १८० ते २०० रुपये असे होते. उत्पादन कमी झाल्याने डस्ट पावडरचे दर वाढले आहेत, असे भवानी पेठ भुसार बाजारातील प्रमुख चहा पावडर विक्रेते विजय गुजराथी यांनी सांगितले.

जगात दुसरा क्रमांक

* संपूर्ण जगात श्रीलंका आणि भारत या दोन देशांतून चहा पावडर विक्रीस पाठविली जाते. चहाचे सर्वाधिक उत्पादन श्रीलंकेत घेतले जाते. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

* युरोपीय देश, अमेरिका, चीनसह संपूर्ण जगभरात भारतातील चहा विक्रीस पाठविला जातो. युरोपीय देशांत विक्रीस पाठविली जाणारी चहा पावडरची प्रत उच्च प्रतीची असते.

* परदेशात विक्रीस पाठविण्यात येणाऱ्या चहा पावडरचे दर प्रतवारीनुसार ८०० ते १२०० रुपये दरम्यान असतात.

झाले काय?

अतिवृष्टीमुळे आसाम आणि केरळमधील चहाचे मळे वाहून गेले. करोनाचा संसर्ग वाढल्याने चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे मजूरदेखील उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे चहाची पाने (प्लकिंग) तोडली गेली नाहीत. करोनाच्या संसर्गामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे चहा पावडरच्या दरात प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती पुण्यातील चहा व्यापारी विजय गुजराथी यांनी दिली.