एखादे प्रवचन ऐकण्याची सक्ती कुणावरही नको. विद्यार्थ्यांना सक्ती नव्हे, तर मुक्ती हवी आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्राने हुकूमशाही कधीच मान्य केली नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली.
शिक्षक दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारां’चे वितरण शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, आमदार विनायक निम्हण, मोहन जोशी, शिक्षण आयुक्त एस. चोकिलगम, शिक्षण सचिव अश्विनी भिडे, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने, विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे आदी त्या वेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, कुणाचे विचार ऐकायचे की नाही, या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, त्यासाठी सक्ती केली जाऊ नये. विद्यार्थ्यांना आता सक्ती नको, तर मुक्तीबरोबरच जबाबदारीचे भान देण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण आणले जाऊ नये. हे क्षेत्र परिवर्तनाचे साधन आहे, याचे भान ठेवले पाहिजे.
तंत्रज्ञान वरदान आहे, पण ते शाप ठरू नये, याची काळजी घेतली पाहिजे व त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. मुलांमध्ये विवेकवाद व विज्ञानवाद रुजविला गेला पाहिजे. दैवावर नव्हे, तर कर्मावर विश्वास ठेवणारी पिढी शिक्षकांनी घडवावी.
मुख्यमंत्री म्हणाले की, नैसर्गिक संपत्तीवर देश महासत्ता होणार नाही, त्यामुळे ज्ञानावर आधारीत अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासाठी सार्वत्रिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पर्याय नाही. सार्वत्रीकरण होते आहे, पण गुणवत्ता वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे शिक्षकांचे इतर प्रश्न महत्त्वाचे असले, तरी विद्यार्थी हा केंद्रबिंदू हवा. राज्याची अर्थव्यवस्था देशात पहिल्या क्रमांकावर आहे. शिक्षणासह इतर क्षेत्रातही राज्य पहिल्या क्रमांकावर केले पाहिजे.
प्रत्येक शाळेत भाषा शिकविणारी प्रयोगशाळा- मुख्यमंत्री
राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये भाषा शिकविणारी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षक पुरस्कार सोहळ्यात दिली. ते म्हणाले की, इंग्रजी जगातील विज्ञानाची, राजकारणाची भाषा झाली आहे. त्यामुळे एक लाख शिक्षकांना ब्रिटिश कौंसिलच्या माध्यमातून इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आता प्रत्येक शाळेत ‘लँग्वेज लॅब’ तयार करणार आहोत. शाळांमधील पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असून, इंटरनेटसह विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ऑनलाइन ज्ञान शहराबरोबरच खेडय़ातील प्रत्येकाला मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी जागतिक संस्था तयार केली जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2014 रोजी प्रकाशित
विद्यार्थ्यांना सक्ती नको, मुक्ती हवी- अजित पवार
एखादे प्रवचन ऐकण्याची सक्ती कुणावरही नको. विद्यार्थ्यांना सक्ती नव्हे, तर मुक्ती हवी आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्राने हुकूमशाही कधीच मान्य केली नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली.
First published on: 06-09-2014 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers award distributed in pune